पुणे: पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या 32 गावांच्या सर्वांगीण विकासासाठी तातडीने सोयी-सुविधांचा आराखडा तयार करा व कामे करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुक्त नवल किशोर राम यांना दिल्या आहेत.
मात्र, या बैठकीत या गावांच्या विकासासाठी लागणारा निधी व थकीत मिळकत कराबाबत समाधानकारक तोडगा काढण्यासाठी चर्चा झाली नाही. महापालिकेच्या प्रशासनाने देखील या मुद्द्यांवर चर्चा केली नाही.
पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या 32 गावांच्या सर्वांगीण विकासाबाबत शनिवार (दि.30) रोजी सर्किट हाऊस येथे महत्त्वपूर्ण बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी 32 गावांतील सुविधांबाबत सादरीकरण केले. या बैठकीला सर्वच राजकीय पक्षाचे सहकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते आले होते.
या बैठकीत विस्तारलेले एकूण क्षेत्रफळ व त्यासाठी लागणारा पाणीपुरवठा, गावांची सद्यस्थिती व आवश्यक मूलभूत गरजा, सोयी-सुविधांचा आराखडा, गाव जोडणीसाठी नदीवरील पूल व रस्ते रुंदीकरण आणि ड्रेनेज नेटवर्क उभारणी आदी विषय हाताळण्यात आले. पुणे शहरांसह ही गावसुद्धा आधुनिक सुविधांनी सुसज्ज व्हावीत, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे उपमुख्यमंत्री पवार या वेळी म्हणाले.
पुण्यात नव्याने समाविष्ट झालेल्या 32 गावांमध्ये अनेक समस्या आहेत. या ठिकाणी ड्रेनेज तसेच रस्त्यांचे जाळेदेखील नाहीत. पाण्याची देखील गंभीर समस्या या गावांमध्ये आहेत. या गावांच्या विकासासाठी कोट्यवधीच्या निधीची गरज महापालिकेला आहे. सध्या या गावातून मिळकत कर वअसून करण्यासदेखील स्थगिती आहे.
यामुळे या बैठकीत या दोन्ही गोष्टींवर महापालिकेच्या अधिकार्यांनी चर्चा करणे अपेक्षित होते. या गावांच्या विकासातही निधी कमी पडू देणार नाही, असे जरी अजित पवार म्हणाले असले तरी हा निधी कधी मिळणार व थकीत मिळकत कराचे काय होणार हे प्रश्न अनुत्तरित आहेत.