

समीर भुजबळ
वाल्हे : ग्रामीण भागातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आणि सामूहिक मदत मिळावी यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा ही एक प्रभावी आपत्कालीन संपर्क प्रणाली सुरू करण्यात आली आहे. संकटकाळात एक व्यक्ती मदतीसाठी कॉल करताच त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना एकाच वेळी मोबाइलवर ऐकू जातो; ज्यामुळे तातडीने मदत मिळण्यास मोठी मदत होते.(Latest Pune News)
अडचणीच्या वेळी तत्काळ मदत मिळावी, या उद्देशाने देशात ही सेवा सुरू करण्यात आली आहे. राज्यातदेखील ही सेवा राबविण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, धाराशिव या सात जिल्ह्यांतील 438 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ही सेवा सुरू आहे. पुणे जिल्ह्याच्या 13 तालुक्यातील ग्रामीण भागातील 30 पोलिस ठाणेअंतर्गत असणाऱ्या गावात ही सेवा सुरू झाली असल्याचे सांगण्यात येते. ग्रामसुरक्षा यंत्रणेत सहभागी कोणताही नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करू शकतो. संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरूपात मिळतो. दुर्घटनेचे स्वरूप, तीवता, ठिकाण कळल्याने गावकऱ्यांना विनाविलंब व नियोजनबद्ध पद्धतीने मदत करता येते.
ग्रामसुरक्षा यंत्रणा ग्रामीण भागासाठी सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण भारतासाठी वापरता येणारा टोल फी नंबर 18002703600 वर नोंदणी केलेल्या नागरिकाने संकट काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाइलवर ऐकू जातो.
घटनाग्रास्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळते. गावातील कार्यक्रम किंवा घटना विनाविलंब ग्रामस्थांना एकाच वेळी कळतात. अफवांना आळा घालणे शक्य होते. प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येतो.
तातडीच्या ग्रामसभा, शाळेच्या सूचना, घरपट्टी-पाणीपट्टी वसुली, सूचना, राशन वाटप, चोरी, दरोडा, पिसाळलेला कुत्रा, बिबट्याचा हल्ला, भूकंप, महापूर, महिलांची छेडछाड, चोरी, आग, वनवा, अपघात, अतिवृष्टी, सर्पदंश, सतर्कतेचे इशारे आदी कामांसाठी उपयोग केला जाऊ शकतो.
ग्रामसुरक्षा यंत्रणा ही ग्रामीण सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असूनही, आजही अनेक गावांतील सरपंच आणि नागरिक या प्रणालीबद्दल अनभिज्ञ आहेत. फक्त पोलिस पाटील या यंत्रणेचा प्रसार व उपयोग करताना आढळून येत आहेत.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही आपत्कालीन सुरक्षा सेवा अतिशय महत्त्वाची मानली जाते. आता नव्याने पुन्हा ही यंत्रणा प्रभावीपणे काम करत आहे. या यंत्रणेवर आपले पोलिस ठाणे बारकाईने लक्ष ठेवत आहे. ग्रामीण भागातील सर्वांनी या यंत्रणेचा आपल्या सुरक्षेसाठी वापर करावा.
दीपक वाकचौरे, सहायक पोलिस निरीक्षक, जेजुरी