

Pune District Bank meeting
पुणे : मुलांना फार लाडावून ठेऊ नका. ऑनलाइन गेम, पब्जीमुळे एका महिलेचं बँक अकाउंट रिकामं झालं. अशा घटना टाळा. हल्ली एकटाच नागोजी असतो, तोच डोक्यावर बसतो. मध्ये काय ड्रीम 11 आले आहे, ते खेळत बसू नका, असे ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या व्यसनावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी उपस्थित सभासदांचे कान टोचले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (पीडीसीसी) बँकेच्या आज (दि.२६) झालेल्या सर्वसाधारण सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बँकेच्या संचालक आणि सभासदांना अनेक सूचनांसह काही विनोदी शैलीतून थेट कानउघडणी केली.
ते पुढे म्हणाले की, अल्पबचत भवनात सभेसाठी जागा अपुरी पडत असल्याने पुढील सभा गणेश कला क्रीडा भवनात भरवावी. सभासदांना खुर्ची ही मिळालीच पाहिजे, ही माझी ठाम अपेक्षा आहे. सगळ्याच गोष्टी नियमावर बोट ठेवून करू नका. शेवटी माणसं जगली पाहिजेत, बळीराजा जगला पाहिजे. उद्या-परवा पुन्हा अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे, त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्यावी.
पवार म्हणाले, मी बँकेचा संचालक होतो, पण उगीच जागा अडवू नये म्हणून मी राजीनामा दिला. मी जेव्हा बँकेत आलो, तेव्हा रमेश आप्पा कारभार पाहत होते. त्यांना काय माहिती, बाबा आपल्याच डोक्यावर येऊन बसणार! पण आलोच. बघता बघता रमेश आप्पासोबतच माझ्या डोक्याचीही केस उडाली, असे म्हणत त्यांनी हशा पिकवला.
3 लाखांच्या पुढे कर्ज दिल्यास 2400 लोकांसाठी बँकेला 9 कोटी रुपये मोजावे लागतात. हे परवडणारं नाही. त्यामुळे पाहिजे तर खातेफोड करा, पण बँकेवर व्याज सवलतीचा बोजा टाकू नका. 2 लाख 88 हजार शेतकऱ्यांना आम्ही 3 लाखांच्या आतील कर्जासाठी आधीच 9 कोटींची व्याज सवलत दिली आहे. आजमितीला बँकेत 15 हजार कोटींच्या वर मुदत ठेवी आहेत. बँक नफ्यात आहे. एआय तंत्रज्ञानासाठी 3 कोटींची तरतूद केली आहे. बँकेत भरती करताना गुणवत्ता पाळलीच पाहिजे. मात्र, जिल्ह्यातील मुलांना संधी द्यावी, पण ते करतानाही गुणवत्ता बघा, असे सांगून त्यांनी भरती प्रक्रियेवरून टोला लगावला.
शिपाई लोकांनो, मॅनर्स पाळा. नाहीतर म्हणायचं, आपल्याला काय दादाने काम लावलंय, असं करू नका. ड्रायव्हर लोकांनी व्यवस्थित गाड्या चालवाव्यात, अशा सुचना कर्मचाऱ्यांना करून मी जरी बँकेच्या बोर्डावर नसलो तरी माझं बारीक लक्ष असेल. पुढेही अशीच साथ द्या, असे आवाहन पवार यांनी केले.