

बीड : “आरक्षणाचा हक्क प्रत्येकाला आहे, मात्र त्यावरून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना थारा देऊ नका. आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळालं पाहिजे, पण जातीचं खूळ डोक्यात भरण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी सावध राहावं,” अशा स्पष्ट शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली ठाम भूमिका मांडली.
यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांपर्यंत ऐतिहासिक संदर्भ देत सांगितलं की, “शिवरायांनी १८ पगड जातींना सोबत घेतलं, बारा बलुतेदारां वर आधार ठेवून स्वराज्य उभारलं. बाबासाहेबांनी जातिव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन समानतेचा संदेश दिला. मात्र आज काहीजण डोक्यात वेगळं खूळ बसवून जातीय तेढ निर्माण करत आहेत. हा खेळ थांबवला नाही, तर सामाजिक सलोख्यावर घाला पडेल,” असा इशारा मनोज जरांगे यांचे नाव न घेता त्यांनी दिला.
अजित पवार पुढे म्हणाले, “आपण सगळे हाडामांसाचे माणूस आहोत. रक्त सगळ्यांचं लालच आहे. जात, पात, नातं, गोतं पाहणं थांबवा. माणूस म्हणून माणसाकडे पाहा. आरक्षणाचा प्रश्न हा माणसाच्या आर्थिक परिस्थितीशी जोडला पाहिजे. कोणी मागणी केली तर त्यांचा हक्क आहे, पण त्यावरून समाजात विष पेरलं जात असेल तर ते थांबवायलाच हवं. जर हे वेळीच थांबवलं नाही तर शासन म्हणून आम्हाला भूमिका घ्यावी लागेल असे त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले.
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या आंदोलनांचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले, “आंदोलनं लोकशाहीत होणं स्वाभाविक आहे; पण आंदोलनाच्या नावाखाली सामाजिक सलोखा बिघडला, समाजा समाजामध्ये तेढ निर्माण झाली, तर त्याचे दूरगामी परिणाम होतील. प्रत्येक मागणी लोकशाही मार्गानेच मांडावी, त्यावर सरकार निर्णय घेईल; पण समाजाला समाजासमोर उभं करणारी कोणतीही भाषा परवडणारी नाही. अलीकडे असे प्रकार मोठ्या प्रमाणावर होताना दिसत असून याची आपण गांभीर्याने दाखल घेतली असल्यचे त्यांनी सांगितले.
अखेर पवारांनी स्पष्ट केलं की, “आरक्षणाचा निर्णय हा आर्थिक निकषावरच घ्यावा. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना न्याय मिळणं गरजेचे आहे. जात-पात विसरून समानतेचा विचार करणं ही काळाची गरज आहे. त्यातूनच समाजात ऐक्य टिकेल,” असा ठाम सूर त्यांनी यावेळी लावला.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जो लढा सुरु करण्यात आला होता त्या लढ्यावर कधीच आपली स्पष्ट भूमिका न मांडणारे अजित पवार यांनी आज बीड जिल्ह्यात याबाबत आपली स्पष्ट भूमिका मंडळी एवढेच नाही तर त्यांनी यावेळी मनोज जरांगे यांनाही त्यांनी टोले लगावले. अजित पवारांच्या या भुमिके नंतर आता या आरक्षण मागणीला नवीन वळण मिळाले आहे.