

बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार हे गुरुवारी बीडच्या पूरग्रस्त भागातील दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी हिंगणी खुर्द गावात पूरग्रस्तांशी संवाद साधला परंतू महिलांशी संवाद साधताना अजित दादांनी भलताच प्रश्न विचारला. अजित पवार यांनी एका महिलेला तुमचे लव मॅरेज आहे का? असे विचारताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला परंतु अजित पवार पुढे निघताच या महिलेने नाराजी देखील व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. अनेकदा ते आपल्या वक्तव्यावरून वादात देखील अडकले आहेत. गुरुवारी अजित पवार हे बीड मधील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असताना हिंगणी खुर्द या गावांमध्ये एका महिलेला तिच्या कुटुंबात किती सदस्य आहेत असे दादांनी विचारले महिलेने एक मुलगा, एक मुलगी असे उत्तर दिल्यानंतर आता थांबले का? असा सवाल अजितदादांनी केला तर दुसऱ्या एका महिलेला तुझं सासर - माहेर कोणतं असं दादांनी विचारलं महिलेने हेच गाव माझं सासर आणि माहेर असल्याचं सांगितल्यानंतर तुमचं लव्ह मॅरेज आहे का? असा प्रश्न अजितदादांनी केला. ग्रामस्थांसमोर असे प्रश्न अजित दादांनी विचारल्याने या महिलांना देखील हा सारा प्रकार लज्जास्पद वाटला. दादांच्या या प्रश्नांवर काय उत्तर द्यावे हे देखील या महिलांना समजले नाही तसेच गावकऱ्यांमध्ये देखील हशा पिकल्याने महिला नाराज झाल्याचे दिसले.
अन दादा त्या ग्रामस्थाला म्हणाले आता तुला मिठी मारू का?
उपमुख्यमंत्री अजित पवार हे हिंगणी दौऱ्यावर असताना एका ग्रामस्थांनी त्याच्या मागणीचे निवेदन त्यांना दिले तसेच त्यामधील एक ओळ त्यांना अंडरलाईन करून दाखवली, ती ओळ दादांनी स्वतः वाचली यामध्ये दादा तुमचा कणखर बाणा मला आवडला असे लिहिलेले होते यावर अजित पवार यांनी आता तुला काय मिठी मारू का? असा असावा केला यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.