पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहराला पिण्यासाठी जेवढे पाणी आवश्यक आहे, तेवढे धरणात राखून ठेवण्यात येणार आहे. उर्वरित पाणी शेतीसाठी सोडले जाणार आहे. सध्या पाणीकपात होणार नाही. मात्र, काटकसरीने पाणी वापरण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिकेला दिल्या. खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री पवार यांच्या उपस्थितीत झाली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी ही माहिती दिली. शहराला किती पाणी लागेल, याची माहिती देण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी आठ दिवसांची मुदत मागितली असून, महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांची एकत्र बैठक घेऊन पालकमंत्री पवार यांना पुढील आठवड्यात दिली जाणार आहे. तसेच जानेवारी-फेब—ुवारीत पुन्हा आढावा घेण्याचे शुक्रवारी ठरविण्यात आले.
शहराला पाणीपुरवठा करणार्या धरणांतील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेता महापालिकेने पाणी जपून वापरावे. गळती रोखण्यासाठी जलसंपदा विभागाच्या मदतीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. खडकवासला प्रकल्पातून नवीन मुठा उजवा कालव्यातून रब्बीचे सिंचन आवर्तन 25 नोव्हेंबरपासून सोडण्यात येणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्या धरणांमध्ये सद्यःस्थितीत 95 टक्केच पाणीसाठा आहे. महापालिकेने पाणीगळती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून काटकसर करण्याची सूचना केली आहे.
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणारे दूषित पाणी रोखण्यासाठी पुणे महापालिका आणि पीएमआरडीए यांनी एकत्रितपणे अभ्यास करून अहवाल सादर करावा. दौंड नगरपालिका व ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी, नवीन मुठा उजवा कालवा, सणसर जोड कालवा, जनाई शिरसाई उपसा सिंचना योजना, मुंढवा जॅकवेलद्वारे पुणे पालिकेने उपलब्ध करून दिलेल्या सांडपाण्याद्वारे जुना मुठा उजवा कालव्यातून शेतीसाठी पाणी देण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. दरम्यान, कुकडी डावा कालव्याचे रब्बीचे आवर्तन 15 डिसेंबरपासून सोडण्यात येणार असून, आगामी काळात किती पाऊस पडतो या आधारे या वेळापत्रकात कमीअधिक बदल करावा, असे निश्चित करण्यात आले आहे.
महापालिकेत समाविष्ट झालेली गावे, वाढती लोकसंख्या आणि स्थलांतराचे वाढते प्रमाण विचारात घेऊन पुणे शहराला 20 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी कोटा मंजूर करावा, अशी मागणी या बैठकीत महापालिकेकडून करण्यात आली. मात्र, जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या निकषानुसार 12.86 टीएमसी कोटा पुण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे वाढीव कोटा मंजूर करता येणार नाही, असे जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांकडून सांगण्यात आले. तसेच जुलै 2024 पर्यंत पुणे शहराला पाणी पुरेल, यासाठी 15 टीएमसी पाणी धरणात राखीव ठेवण्यात येणार आहे.
हेही वाचा