

पुणे : 'भाऊ, तुम्ही पुढे वाढा, आम्ही तुमच्यासोबत आहोत' अशा घोषणा देणारे कार्यकर्ते आणि पक्षात एकत्र काम करणारेच कार्यकर्ते एकाच जागेच्या उमेदवारीसाठी समोरासमोर उभे ठाकल्याचे चित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुलाखतीदरम्यान पाहायला मिळाले. रविवारी (दि. २१) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इच्छुक उमेदवारांच्या स्वतः मुलाखती घेतल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील सर्व ४१ प्रभागांमधून ७११ इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. रविवारी बारामती हॉस्टेल येथे या इच्छुकांच्या मुलाखती सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत अजित पवार यांनी घेतल्या. या वेळी महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, पक्षाचे दोन्ही शहराध्यक्ष सुनील टिंगरे, सुभाष जगताप उपस्थित होते.
या वेळी इच्छुक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मुलाखतीसाठी फक्त इच्छकांनाच खोलीत आत सोडले जात होते. त्यानंतर मुलाखत देऊन परत आल्यानंतर इच्छुकांच्या चेहऱ्यावर पहिली परीक्षा पास झाल्याचे समाधान दिसून येत होते. दरम्यान, एक इच्छुक उमेदवार थेट ॲम्ब्युलन्समधून मुलाखतीसाठी आले होते.
या मुलाखतीदरम्यान अजित पवार यांनी प्रत्येक इच्छुक उमेदवाराला महापालिकेची निवडणूक का लढायची आहे, पक्षात कधीपासून सक्रिय आहे, राजकीय पार्श्वभूमी आहे का, स्थानिक जनसंपर्क, प्रभागातील केलेली कामे तसेच मतदारांशी असलेले संबंध यासंदर्भातील प्रश्न विचारले.
यापूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठीही अशाच पद्धतीने सर्व ३२ प्रभागांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती स्वतः अजित पवार यांनी घेतल्या होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर आणि प्रवक्त्या रूपाली पाटील-ठोंबरे यांच्यात फलटण प्रकरणावरून वाद झाला होता. त्या वेळी रूपाली ठोंबरे यांनी टीका करीत चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. मात्र, रविवारी रूपाली चाकणकर पक्षाच्या मुलाखत पॅनेलमध्ये उपस्थित होत्या. या वेळी इच्छुक उमेदवारांना त्यांच्यासमोरच आपल्या कार्याचा पाढा वाचावा लागला.
आगामी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस पक्षासह इतर पक्षांतील माजी नगरसेवकांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये अस्मिता शिंदे, श्वेता चव्हाण, रशिद शेख, मिलिंद काची यांचा समावेश आहे.