

बारामती: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. 22) बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘श्री छत्रपती’च्या मोठ्या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे ‘माळेगाव’साठी नेमकी कोणती भूमिका घेतात? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
निरा खोर्यातील सोमेश्वर, माळेगाव व श्री छत्रपती या तिन्ही सहकारी साखर कारखान्यांवर सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकहाती सत्ता आहे. ’माळेगाव’चा इतिहास पाहता पवार यांना येथील सभासदांनी धक्का दिल्याची उदाहरणे आहेत. (Latest Pune News)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी असल्याने अजित पवार यांच्याकडे सध्या बारामती तालुक्यासाठी तितकासा वेळ नाही. या पार्श्वभूमीवर ‘श्री छत्रपती’प्रमाणे सर्वपक्षीयांना एकत्र करून संघर्ष कमी करीत निवडणूक एकतर्फी कशी होईल, यादृष्टीनेच त्यांच्याकडून प्रयत्न होतील, असे बोलले जात आहे.
गुरुवारी बारामतीत पार पडणारा मेळावा त्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. ‘माळेगाव’च्या कार्यक्षेत्रातील पवार यांचे विरोधक ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे व ‘माळेगाव’चे माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे या दोघांनीही लोकसभा, विधानसभेला अजित पवार यांच्यासोबत महायुती म्हणून प्रचारात सहभाग घेतला आहे. या नेत्यांचा पवार यांच्याशी संवाद वाढल्याचे त्या वेळी दिसून आले होते.
आता पवार कारखान्याबाबत नेमकी काय भूमिका घेतात? याची उत्सुकता लागली आहे. या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे व शहराध्यक्ष जय पाटील यांनी केले आहे.