Illegal Fishing: ‘उजनी’तील अवैध मासेमारीविरोधात महिलांचे आजपासून उपोषण

गेल्या 29 वर्षांत बेसुमार मासेमारीमुळे उजनीतील मत्स्यसंपदा व जैविक साखळी धोक्यात
Pune News
‘उजनी’तील अवैध मासेमारीविरोधात महिलांचे आजपासून उपोषणFile Photo
Published on
Updated on

पळसदेव: उजनीतील अवैध मासेमारी करणार्‍यांवर व त्यांना सहकार्य करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाईच्या मागणीसाठी उजनीतील रणरागिणी मच्छीमार महिला निर्णायक लढ्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. गुरुवारी (दि. 22) पुणे येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर या महिला बेमुदत उपोषणास बसणार आहेत.

गेल्या 29 वर्षांत बेसुमार मासेमारीमुळे उजनीतील मत्स्यसंपदा व जैविक साखळी धोक्यात आल्याने उजनीतील जवळपास 40 ते 50 माश्यांच्या जाती दुर्मीळ व नामशेष झाल्या होत्या. मत्स्यबीज सोडले जात नव्हते. परिणामी, उत्पादनात प्रचंड घट होऊन रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. (Latest Pune News)

त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार व क्रीडा तसेच युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पुढाकारातून उजनीत 2024-25 मध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून नावीन्यपूर्ण योजनेतून मत्स्यबीज सोडण्यात आले. सोडलेले मत्स्यबीज व गावरान जातींच्या माशांचे संवर्धन व्हावे, यासाठी अजित पवार व जिल्हाधिकारी यांच्या सूचनेवरून अघोरी पद्धतीने म्हणजे वडाप, पंड्याच्या साहाय्याने मासेमारीवर बंदी घालण्यात आली होती. अवैध मासेमारीवर कारवाईसाठी शासकीय समिती स्थापन करण्यात आली होती. गेल्या वर्षी याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणात मासे मिळू लागले. मात्र, फिशमाफियांनी यावर्षी वडाप व पंड्याच्या साहाय्याने बेसुमार अवैध मासेमारी सुरू केली. याबाबत स्थानिक मच्छीमार संघटनेने वेळोवेळी कारवाईची मागणी केली. परंतु, अधिकारी व अवैध मासेमारी करणार्‍यांच्या संगनमताने दैनंदिन 20 ते 80 टन मासेमारी करण्यात येत आहे. यावरून संतापलेल्या उजनीतील मच्छीमार महिलांनी आता आंदोलन हाती घेत झालेल्या अवैध मासेमारी तसेच अधिकार्‍यांच्या चौकशीसाठी आणि समितीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पुणे येथील जलसंपदा कार्यालयाच्या कार्यालयासमोर गुरुवारपासून प्राणांतिक उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. मागण्या मान्य न झाल्यास लहान मासे व सडके मासे टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

उपोषणकर्त्या महिलांमध्ये अनिता कैलास नगरे, आशा भगवान भोई, संगीता संजय परदेशी, चंद्रकला जयराम शिंदे, ललिता बबन पतुरे, कोमल अतुल पतुरे, मनीषा संजय नगरे, केसर दादाराम शिंदे, दीपाली विश्वास भोई, जयश्री प्रवीण नगरे, आशा बलभीम भोई, निर्मला दीपक भोई, मंदा लतिफ काळे, मनीषा संतोष सलमपुरे, शालन सुनील परदेशी आणि शारदा हरिश्चंद्र भोसले यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news