खडकवासला /पुणे: धरण माथ्याखाली पावसाचे प्रमाण कमी असले तरी पानशेत, वरसगाव टेमघर धरण क्षेत्रातील डोंगरी पट्ट्यात संततधार सुरू आहे. त्यामुळे शनिवारी (दि. 5) खडकवासला धरणसाखळीतील पाण्याची पातळी 17.96 टीएमसी म्हणजे 61.61 टक्क्यावर पोहचली. टेमघर धरणही 50 टक्के भरले आहे. दरम्यान, खडकवसाला धरणातून मुठा नदीतील विसर्ग घटविण्यात आला आहे. (Latest Pune News)
रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यावरील दापसरे, टेकपोळे, धामण ओहोळ, तव आदी ठिकाणी शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला. त्यामुळे पानशेत, वरसगाव मध्ये पाण्याची आवक वाढली.
पानशेतची पातळी 60 तर वरसगावची पाण्याची पातळी 66 टक्क्यांहून अधिक झाली आहे. खडकवासला धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे. खडकवासला धरणातून 1 हजार 655 क्सुसेक पाणी मुठा नदीत सोडले जात आहे. तसेच पिण्यासाठी जवळपास 680 क्सुसेक पाणी सोडले जात आहे. एवढ्या पाण्याची तुट भरून खडकवासलाची पाणीपातळी 60 टक्क्यांहून अधिक आहे.
धरणसाखळीत गेल्या 24 तासात अर्धा टीएमसी पेक्षा अधिक म्हणजे 0.59 टीएमसीची वाढ झाली. शुक्रवारी (दि. 4) सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत 17.37 टीएमसी पाणी होते. खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे म्हणाले, धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यास जादा पाणी खडकवासलातुन मुठा नदीच्या पात्रात सोडण्यात येणार आहे. सध्या धरणाची पातळी 60 टक्क्यावर आहे. त्यामुळे विसर्ग कमी करण्यात आला आहे.
दिवसभरात टेमघर येथे 17, वरसगाव येथे 14, पानशेत येथे येथे 15 व खडकवासला येथे 2 मिलिमीटर पाऊस पडला.