Kunal ganbote on Opration sindoor
पुणे : माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच माझ्या वडिलांच्या हत्येचा बदला पंतप्रधानांनी आणि भारतीय लष्कराने घेतला, ही माझ्यासाठी अनमोल भेट आहे. हवाईहल्ला करून दहशतवाद्यांना कंठस्नान घालून माझ्यासह पहलगाममध्ये मृत्यू झालेल्या 26 जणांच्या कुटुंबीयांना यामुळे मोठा धीर मिळाला आहे. या कारवाईमुळे आम्ही समाधानी आहोत. तसेच, पंतप्रधान आणि भारतीय लष्कराचेही आभारी आहोत, अशा भावना पुण्यातील कौस्तुभ गनबोटे यांचा मुलगा कुणाल गनबोटे याने बुधवारी (दि.07) व्यक्त केल्या.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना न्याय म्हणून बुधवारी दहशतवाद्यांच्या पीओकेतील 09 तळांवर हल्ला करून ते उद्ध्वस्त करण्यात आले. यात अनेक दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. पीओकेतील या हवाई हल्ल्यानंतर पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या पुण्यातील कौस्तुभ गनबोटे यांचे चिरंजीव कुणाल गनबोटे याच्याशी बुधवारी संवाद साधण्यात आला. ‘कुणाल’चा बुधवारी वाढदिवस होता. त्याच दिवशी असा हवाई हल्ला करून माझ्या वडिलांना न्याय मिळाला असे म्हणत, ही मला वाढदिवशी मिळालेली अनमोल भेट आहे, अशी भावना त्याने या वेळी बोलताना व्यक्त केली. ‘कुणाल’साठी बुधवारचा दिवस यामुळे अविस्मरणीय ठरला. (Pudhari News Update)
बुधवारी पत्रकारांशी बोलताना कुणालने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेबद्दल समाधान व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्कराने जे काही केले, त्यामुळे आम्ही पूर्णपणे समाधानी आहोत. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नावच खूप प्रशंसनीय आहे, असे कुणाल भावूक होऊन म्हणाला. त्याचे वडील दहशतवादी हल्ल्यात गेले. त्यामुळे हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी, अशी त्याची आणि त्याच्या कुटुंबाची मागणी होती. मात्र, त्यासोबतच दहशतवादाचे समूळ उच्चाटन व्हावे, अशीही त्यांची तीव्र इच्छा होती.
आपला आज वाढदिवस असल्याचे सांगताना कुणाल म्हणाला की, माझ्या वाढदिवशीच अतिरेक्यांवर ही कारवाई झाली, हे माझ्यासाठी सर्वात मोठे गिफ्ट आहे! पंतप्रधान आणि लष्कराचे आभार मानताना कुणालने दहशतवादाच्या पूर्ण नायनाटाची अपेक्षा व्यक्त केली. एका पित्याच्या बलिदानाच्या बदल्याचा आणि एका मुलाच्या वाढदिवसाचा योगायोग एका महत्त्वपूर्ण लष्करी कारवाईने जोडला गेला, यामुळे माझ्यासाठी हा दिवस केवळ आनंददायी नव्हे, तर अत्यंत अर्थपूर्ण ठरला, अशा भावना त्याने या वेळी व्यक्त केल्या.