

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर जेजुरीनजीक भोरवाडी फाटा (ता. पुरंदर) येथे एसटी बसची दुचाकीला धडक बसल्याने तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाल्याने ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले, परंतु माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आवाहन केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. एसटी महामंडळाकडून या पालखी महामार्गावरील अपघातग्रस्तांच्या कुटुंबातील सदस्यांना अद्यापपर्यंत कोणतीही मदत मिळाली नसल्याने आजच्या अपघातातील मृत्युमुखी तरुणाच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत देण्यात यावी. तसेच एसटी बसचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. एसटीचे अधिकारी लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत पालखी महामार्गावरून उठणार नाही, असे म्हणत ग्रामस्थांनी पालखी महामार्ग ठिय्या मांडला.
जेजुरीचे पोलिस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर व पोलिस अंमलदारांनी ग्रामस्थांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुण ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. या वेळी माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अपघातस्थळी येऊन माहिती घेऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. अधिकार्यांशी फोनवरून चर्चा करून कारवाई करावी, अशा सूचना संबंधित अधिकार्यांना केली. मी तुमच्याबरोबर आहे, जोपर्यंत अपघातग्रस्त कुटुंबातील सदस्यांना अधिकारी लेखी आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत मीही तुमच्याबरोबर पोलिस ठाण्यात बसून राहतो.
कारवाई करण्यासाठी मी सोबत असून, पाठपुरावा करण्याचे आश्वासन शिवतारे यांनी देऊन पालखी महामार्ग रोखून धरू नका, असे आवाहन केल्यानंतर रोखलेला पालखी मार्ग मोकळा करून दिला आणि आंदोलक सुकलवाडी वाल्हे येथील ग्रामस्थ जेजुरी पोलिस ठाण्यात येऊन बसले होते. सायंकाळी सात वाजेपर्यंत तरी एसटी महामंडळातील अधिकारी जेजुरीत पोहोचले नव्हते. जोपर्यंत संबंधित विभागातील अधिकारी लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
हेही वाचा :