मुलांनो…परीक्षेची भीती वाटतेय..? एक कॉल करा!

Student
Student
Published on
Updated on

गणेश खळदकर

पुणे : विद्यार्थ्यांना दहावी-बारावीचे पेपर कसे द्यायचे, पेपर अवघड गेला आता काय करायचे, दहावी झाली, पुढे काय, बारावीनंतर करिअरची दिशा कोणती, परीक्षेचीच भीती वाटतेय, कसा सोडवायचा पेपर… अशा नानाविध प्रश्नांनी ग्रासलेले असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात वेगळेच विचार येतात. साहजिकच टेन्शन घेऊन चुकीचे पाऊल उचलण्यापेक्षा एक कॉल करा आणि तुमच्या सर्व समस्यांवर उपाय शोधा… असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी केले आहे.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना राज्यातील तब्बल 426 समुपदेशकांमार्फत परीक्षा आणि करिअर यांसह अन्य बाबींवर मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ज्यांनी व्यवसाय मार्गदर्शनाचा एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, अशा राज्यातील वेगवेगळ्या शाळांमधील शिक्षकांमार्फत हे मार्गदर्शन केले जाणार आहे.

गेल्यावर्षी साधारण पावणेदोन लाख विद्यार्थ्यांनी समुपदेशनासाठी कॉल केला होता. यंदादेखील विद्यार्थ्यांचे कॉल येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या अभ्यास कसा करावा, ताणतणावाचे व्यवस्थापन या संदर्भातील विद्यार्थ्यांचे प्रश्न येत आहेत. परीक्षा काळात पेपर अवघड गेला आहे, पुढचा पेपर कसा जाईल, या संदर्भात प्रश्न विचारले जातात. निकालानंतर दहावीचे विद्यार्थी अकरावी प्रवेश आणि विविध शाखांमधील करिअर, तर बारावीचे विद्यार्थी विविध परीक्षा, तसेच बारावीनंतरच्या करिअरच्या वाटा याविषयी प्रश्न विचारत असतात. साधारण फेब्रुवारी ते जुलैअखेरपर्यंत विद्यार्थ्यांना समुपदेशन केले जाते.

जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेत समुपदेशन विभाग आहे. या विभागामार्फत जिल्ह्यातील समुपदेशकांवर नियंत्रण ठेवले जाते. या विभागामार्फत विद्यार्थ्यांना काय समस्या आल्या, तो विद्यार्थी कोणत्या भागातील होता, याची माहिती गोळा केली जाते. त्यामुळे दहावी-बारावी परीक्षेविषयी चिंताग्रस्त असाल, तर टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी समुपदेशकांना कॉल करून योग्य मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन विद्या प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी केले आहे.

या चार टप्प्यांत होते समुपदेशन

  • परीक्षापूर्व समुपदेशन
  • परीक्षा काळातील समुपदेशन
  • परीक्षेनंतरचे समुपदेशन
  • निकालानंतरचे समुपदेशन

या वेबसाइटवर आहे समुपदेशकांची यादी : https://maa.ac.in/

  • गेल्या वर्षी तब्बल पावणेदोन लाख विद्यार्थ्यांनी घेतला लाभ
  • राज्यात 426 समुपदेशकांमार्फत विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या मनात असलेले परीक्षेचे दडपण दूर करण्यासाठी समुपदेशकांची मोठी मदत विद्यार्थ्यांना होत आहे. गेल्या वर्षी पावणेदोन लाख विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. यंदादेखील अनेक विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत. परीक्षा, तसेच करिअरविषयी विद्यार्थ्यांच्या मोठ्या शंका असतात. त्यासाठी समुपदेशकांमार्फत विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केले जात आहे.
                                                         – विकास गरड, उपसंचालक, विद्या प्राधिकरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news