

पुणे : खेळामध्ये स्वत:ला झोकून दिल्यास आपल्यातील अधिक सक्षम व्यक्तिमत्त्व उलगडत जाते. त्याद्वारे मिळालेली ताकद जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्याला मदत करते.
खेळाचे मैदान आणि न्यायालये वेगवेगळी दिसू शकतात. मात्र, त्यामध्ये कार्यरत असणारा खेळाडू असो वा वकील, त्याची एकाग्रता, बांधिलकी आणि न्याय्यपणा ही मूल्ये समानच असतात, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय नेमबाज पूजा घाटकर यांनी केले.
पुणे बार असोसिएशन आणि लाॅयर्स डेव्हलपमेंट फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने दोनदिवसीय वकिलांच्या राज्यस्तरीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बिबवेवाडी य़ेथील शिंदे बॅडमिंटन कोर्ट व स्पोर्ट्स काॅम्प्लेक्स येथे आयोजित स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी घाटकर बोलत होत्या. या वेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन, कौटुंबिक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्याम रुक्मे, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. हेमंत झंजाड, फॅमिली कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षा ॲड. कल्पना निकम, डाॅ. सुधाकरराव जाधवर अन्य मान्यवर या वेळी उपस्थित होते.
लाॅयर्स डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष ॲड. अभिषेक जगताप यांनी पुणे बार असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित केलेल्या स्पर्धेत राज्यभरातील 150 हून अधिक वकिलांनी सहभाग घेतला. पुरुष व महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी अशा विविध गटांमध्ये सामने खेळविण्यात आले. स्पर्धेमुळे क्रीडाभावना, शारीरिक तंदुरुस्ती व परस्परस्नेह वृद्धिंगत झाल्याचे मत वकीलवर्गाकडून व्यक्त करण्यात आले. ॲड. डाॅ. राजेंद्र अनभुले, ॲड. विकास ढगे पाटील, ॲड. विशाल शिवले, ॲड. राम भुजबळ, ॲड. शिवराज निंबाळकर, ॲड. सम्राट जांभूळकर, ॲड. समीर बेलदरे यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. रुची मेमाने यांनी केले. ॲड. माधवी पवार यांनी आभार मानले.