

पुणे : कुख्यात गुंड बंडू आंदेकरचा नातू तुषार वाडेकर व स्वराज वाडेकर यांच्या 'हीच आईची इच्छा' या इमारतीमध्ये घरझडती घेत असताना आंदेकर टोळीच्या दोघा वकिलांनी या कारवाईला विरोध करून सरकारी कामकाजात अडथळा आणल्याने त्यांच्याविरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अॅड. मिथुन सुनील चव्हाण आणि अॅड. प्रशांत चंद्रशेखर पवार अशी गुन्हा दाखल झालेल्या वकिलांची नावे आहेत. याबाबत खंडणीविरोधी पथकाचे पोलिस हवालदार प्रफुल्ल चव्हाण यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खंडणीविरोधी पथकातील पोलिसांनी या ठिकाणाहून २ पिस्तुलांसह चांदीचे दागिने, कागदपत्रे, रोकड असा ३७ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
बंडू आंदेकरचा नातू स्वराज वाडेकरच्या 'हीच आईची इच्छा' या चारमजली इमारतीत १५ डिसेंबरला घरझडती सुरू केली होती. याच इमारतीतील भाडेकरू प्रभू मारुती लोकरे यांच्या घराची झडती घेण्यात येत होती. त्याचे पंचांसमक्ष ई-साक्षद्वारे व व्हिडीओ शूटिंग केले जात होते. त्या वेळी दोघे अचानक आले व हाऊस सर्चला आम्ही आंदेकर यांचे वकील आहोत, म्हणत कारवाईत अडथळा आणला तसेच पोलिसांवर दबाव टाकल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.