वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला : उत्तम आरोग्याचा संकल्प नको; कृती करा

वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला : उत्तम आरोग्याचा संकल्प नको; कृती करा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नवीन वर्षाच्या निमित्ताने आरोग्याची उत्तम काळजी घेण्याचे, वजन कमी करण्याचे संकल्प बहुतांश लोक करतात. मात्र, प्रत्यक्षात वर्ष सुरू झाल्यावर संकल्प हवेत विरून जातात आणि 'ये रे माझ्या मागल्या' अशी परिस्थिती होते. मात्र, 'आरोग्य हीच संपत्ती' असल्याने केवळ संकल्प नको, कृती करा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

बदलती जीवनशैली, चुकीची आहारपध्दती आणि व्यायामाचा अभाव यामुळे कमी वयात अनेक आजारांना आमंत्रण मिळते. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब अशा अनेक आजारांची शक्यता बळावते. आजार झाल्यावर उपचार घेण्यापेक्षा प्रतिबंध म्हणून नवीन वर्षाच्या निमित्ताने संतुलित आहार आणि नियमित व्यायामाचे नियोजन केले पाहिजे, असे मत जनरल फिजिशियन डॉ. अनिकेत देशपांडे यांनी व्यक्त केले.

बहुतांश वेळा खरेदी, पर्यटन, खाद्यभ्रमंती अशा बाबींवर भरपूर खर्च केला जातो. मात्र, आरोग्याकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. जीवनशैलीतील बदलांमुळे अनेक आजार कमी वयात डोकावू लागतात. आजकाल जंकफूडच्या सेवनाचे प्रमाण वाढले आहे. जंकफूडचे सेवन आणि बैठ्या कामाची पध्दत धोकादायक ठरत आहे. त्यामुळेच सॅलड, ताक, भाकरी, कडधान्ये, पालेभाज्या, फळे, सुका मेवा आदी पदार्थांचे सेवन करावे, असा सल्ला आहारतज्ज्ञ पोर्णिमा लिमये यांनी दिला आहे.

काय करावा संकल्प?

  • उत्तम आरोग्यासाठी पुरेशी झोपही महत्त्वाची असते. त्यामुळे रात्री लवकर झोपण्याची आणि सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घ्यावी.
  • मानसिक आरोग्य जपण्यासाठी स्क्रीन टाईमचा वापर कमी करावा.
  • आहारात पोषक पदार्थांचा समावेश करावा. साखर, मैदा आदींचे प्रमाण कमी करावे.
  • दररोज नियमियपणे योगा, चालणे, धावणे अथवा जिममध्ये व्यायाम करण्याची सवय असावी.
  • मन:शांतीसाठी ध्यानधारणा, आवडता छंद जोपासणे फायद्याचे ठरू शकते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news