पुणे, मावळ, शिरूरच्या मतदानासाठी प्रशासन अलर्ट : सोमवारी होणार मतदान

पुणे, मावळ, शिरूरच्या मतदानासाठी प्रशासन अलर्ट : सोमवारी होणार मतदान
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे, मावळ व शिरूर मतदारसंघात सोमवारी (दि. 13 मे) होणार्‍या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान सुरळीत, शांततेत पार पाडण्यासाठी, सार्वजनिक शांततेला व मालमत्तेला धोका पोहोचू नये, याकरिता जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. प्रामुख्याने मतदान केंद्रांच्या 100 मीटर परिसरातील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यावसायिक दुकाने, रेस्टॉरंट, टपर्‍या आदी सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश शहराचे पोलिस सहआयुक्त प्रवीण पवार यांनी जारी केले आहेत.

पुणे पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पुणे लोकसभांतर्गत वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट व कसबा पेठ तसेच शिरूर मतदारसंघातील शिरूर व हडपसर विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. हे आदेश पुणे लोकसभा मतदारसंघांतील 405 मतदान केंद्रामधील 2017 मतदान खोल्यांसाठी तसेच शिरूर मतदारसंघातील 129 मतदान केंद्रांमधील 708 मतदान खोल्यांसाठी लागू राहतील.

मतदान केंद्रांच्या 100 मीटर सभोवतालच्या परिसराचा प्रचारासाठी व इतर कारणांसाठी गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये जारी केले आहेत. हे आदेश 12 मे रोजी रात्री 12 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया संपेपर्यंत लागू राहतील. पुणे व शिरूर लोकसभा मतदारसंघात होणार्‍या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात 11 मे रोजी सायंकाळी 6 पासून 13 मे रोजी रात्री 12 पर्यंत बेकायदेशीर जमाव तसेच सार्वजनिक सभा बैठका घेण्यास पुणे शहर पोलिस सहआयुक्त प्रवीण पवार यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले आहेत.

दिशाभूल करणार्‍या संदेशांपासून सावध राहा

मतदान यादीत नाव नसल्यास नमुना क्र.17 चा अर्ज भरून आणि आपले मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार असल्याचा दिशाभूल करणारा संदेश पसरविले जात असल्याचे निदर्शनास आले असून, अशा संदेशांपासून सावध राहावे, अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच असे संदेश पुढे पाठवू नयेत, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे. मतदार यादीत नाव नसतानाही नावे यादीतून वगळलेली असलेल्या नागरिकांनी मतदान केंद्रावर जाऊन अर्ज क्र.17 भरावा. असे नागरिक मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करू शकणार असल्याने ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन त्वरित पुढील प्रक्रिया करावी, असा संदेश भ्रमणध्वनीवरून देण्यात येत आहे. अशा दिशाभूल करणार्‍या माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, अशी चुकीची माहिती पसरविणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.

48 तास अगोदरपासून प्रतिबंध

पुणे पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पुणे लोकसभांतर्गत वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट व कसबा पेठ तसेच शिरूर मतदारसंघातील शिरूर व हडपसर विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या आदेशान्वये मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी मतदान प्रक्रिया पूर्ण होण्याच्या 48 तास अगोदरपासून बेकायदेशीर जमाव जमवणे, सार्वजनिक सभा घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news