

पुणे : यंदा शहरावर मान्सून मेहरबान असून तो रविवारपासून पुन्हा सुसाट सुटला आहे. अरबी समुद्रातून आलेल्या वाऱ्यांनी वेग घेतल्याने मान्सूनने रविवारी रात्रभर आणि सोमवार दिवसभर असा शहरावर चोवीस तास जलाभिषेक केला. 24 तासांत शहरात 36 मि.मी. तर जूनच्या सोळा दिवसांत 163.5 मि.मी. तर मे आणि जून मिळून 433.5 मि.मी. इतक्या विक्रमी पावसाची नोंद शहरात झाली आहे.
यंदा शहरात मान्सून 26 मे रोजी आल्याने 17 ते 27 मे या कालावधीत 270 मि.मी. इतका गत 63 वर्षांतील विक्रमी पाऊस झाला. तर जूनमध्ये सतत पाऊस सुरूच आहे. त्यामुळे 16 जूनअखेर शहरात 163 मिलीमीटरची नोंद झाली. शहरातील जूनची सरासरी 156 मि.मी. इतकी आहे. मात्र, ती सोळा दिवसांतच गाठल्याने अजून पंधरा दिवसांत विक्रमी पावसाची नोंद होईल, असा अंदाज आहे.
रविवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली. मात्र, सायंकाळी हलका पाऊस झाला. रात्री 12 नंतर अचानक पावसाला सुरुवात झाली, हा पाऊस एकाच वेगाने रात्रभर सुरू होता. सोमवारचा दिवस उगवला तो संततधार पावसाने शाळेचा पहिला दिवस असल्याने पालकांसह विद्यार्थ्यांनी रेनकोट घालूनच शाळेतच गेले. मुलांचे पावसात स्वागत झाले. सोमवारी दिवसभर पाऊस सुरू असल्याने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरातील सर्वपेठा आणि उपनगर भागात रस्त्यांवर चिखल तयार झाला. अनेक वाहनधारक घसरून पडत होते. गारठा वाढल्याने चहाची मागणी वाढली होती.
शिवाजीनगर 30.6
पाषाण 42.5
एनडीए 46.5
लोहगाव 22.4
चिंचवड 28
लवळे 44
मगरपट्टा 27.5
कोरेगाव पार्क 1.5
शिवाजीनगर 5.9
पाषाण 5.8
लोहगाव 5.4
चिंचवड 9
लवळे 12
एनडीए 8