

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शहरातील 31 मार्च 2023 अखेर 50 हजारांपेक्षा जास्त थकबाकी असणार्या मिळकती महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या वतीने जप्त करण्यात येणार आहेत. एकूण 39 हजार 655 मिळकतधारकांकडे तब्बल 650 कोटींची थकबाकी आहे. एसएमएस, कॉलिंगद्वारे आवाहन केल्यानंतर थकीत कर न भरल्यास येत्या 15 दिवसांत जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. तर, जप्त केलेल्या 100 मिळकतींचा दोन महिन्यांत लिलाव करण्यात येणार आहे.
गतवर्षी सुमारे साडेतीनशे कोटी थकीत असलेला कर वसूल करण्यात आला. महिला बचत गटांच्या वतीने सर्वांना बिलांचे वाटप करण्यात आले आहे. एक लाखापेक्षा जास्त कर थकीत असलेल्या 22 हजार मिळकतधारकांना 2023-24 या आर्थिक वर्षाच्या कराच्या बिलाबरोबरच जप्तीपूर्व नोटिसा बजावल्या आहेत. त्यामधील 1 हजार 826 मिळकतधारकांनी 15 कोटी 71 लाख, 1 हजार 180 मिळकतधारकांनी पार्ट पेमेंट करून 7 कोटी 58 लाख रुपयांचा भरणा केला आहे.
कराचा भरणा न केलेल्या नागरिकांना एसएमएस तसेच, आयव्हीआरएस प्रणालीचा वापर करून प्रिरेकॉर्डेड कस्टम कॉलद्वारे संपर्क केला जाणार आहे. शहरात होर्डिंग लावून सवलत योजनेची प्रसिध्दी केली जाणार आहे. सर्वाधिक थकबाकीदार असलेले शहरातील भाग निश्चित करून तेथे माहितीपत्रके वाटप तसेच, रिक्षांवर लाऊड स्पीकरद्वारे प्रसिध्दी करण्यात येणार आहे. 30 जूनअखेर 400 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच, ऑनलाइन करसंवाद कार्यक्रम चौथ्या शनिवारी आयोजित न करता तिसर्या म्हणजेच येत्या शनिवारी (दि.17) सकाळी साडेअकराला आयोजित करण्यात आला आहे, असे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.
थकबाकीदारांच्या मिळकती जप्तीची कारवाई सुरू करण्यात येत आहे. तसेच, जप्त केलेल्या मिळकतींचा लिलाव कायद्यानुसार करण्यात येणार आहे. कारवाईसाठी एमएसएफचे जवान उपलब्ध करून देण्यात आले आहेत. येत्या पंधरा दिवसांत जप्तीची धडक कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले आहेत, असे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.
हेही वाचा