निरा: रेल्वे हद्दीतील 62 अतिक्रमणांवर कारवाई

निरा: रेल्वे हद्दीतील 62 अतिक्रमणांवर कारवाई

निरा : पुढारी वृत्तसेवा

पुणे – मिरज लोहमार्गावर पुरंदर तालुक्यातील निरा येथील नदीवरील रेल्वे पुलानजीकच्या रेल्वेच्या जागेच्या हद्दीत अतिक्रमण केलेल्या डोंबारी समाजाच्या गोपाळवस्तीतील 57 व मस्जिदजवळील 5 पक्की व साधे घरांची अतिक्रमणे रेल्वे प्रशासनाने बुधवारी (दि.25) दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास काढली. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने आधीच नोटिसा बजावल्याने लोकांनी उपयोगी असणारे साहित्य इतरत्र हलविल्यामुळे मोठे नुकसान टळले.

पुणे-मिरज लोहमार्गाचे दुहेरीकरण व रेल्वेस्थानकाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने रेल्वे प्रशासनाने गेली चार वर्षांपासून निरा येथील रेल्वेच्या जागेत अतिक्रमण करून घरे उभारलेल्या लोकांना नोटिसा बजावून जागा खाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शुक्रवारी ( दि.20) अतिक्रमित असलेल्या घरांवर लाल रंगाच्या खुणा करून अंतिम नोटिसा चिकटविण्यात आल्या होत्या. अतिक्रमणे काढण्याची अंतिम तारीख 24 मे होती.

बुधवारी (दि.25) रेल्वेचे सिनिअर सेक्शन इंजिनिअर ओस्पाल सिंग यादव यांच्या नेतृत्वाखाली 20 कर्मचारी, आर. पी. एफ.चे पोलिस निरीक्षक, जी. आर. पी. पोलिस, स्थानिक पोलिस व दोन जेसीबी, एक ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मदतीने गोपाळवस्तीतील 57 अतिक्रमित घरे व मस्जिद जवळील 5 अतिक्रमित घरांच्या अर्धवट राहिलेल्या भिंती भुईसपाट करून जागा सपाट केली.

गुरुवारी (दि.19) वाल्हा येथील व बुधवारी (दि.25) निरा रेल्वे हद्दीतील 62 अतिक्रमणे काढण्याची कारवाई केली. येत्या एक-दोन दिवसांत लोणंद येथील रेल्वेच्या हद्दीतील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत.
ओस्पालसिंग यादव, सिनिअर सेक्शन इंजिनिअर (सिव्हिल वर्क)

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news