जेजुरी: अडीच वर्षांनंतर जेजुरीत होणार खंडोबादेवाची सोमवती यात्रा

जेजुरी: अडीच वर्षांनंतर जेजुरीत होणार खंडोबादेवाची सोमवती यात्रा

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणार्‍या जेजुरीच्या खंडोबादेवाची सोमवती यात्रा अडीच वर्षांच्या कोरोनाच्या संकटानंतर सोमवारी (दि. 30) भरणार आहे. सोमवती यात्रेच्या नियोजनासाठी मंगळावारी (दि. 24) ऐतिहासिक मल्हार गौतमेश्वर (छत्री मंदिर) मंदिर आवारात ग्रामस्थांची बैठक झाली. सोमवारी (दि. 30) अमावास्या सायंकाळी 4 वाजून 59 मिनिटांपर्यंत असल्याने सकाळी 11 वाजता जेजुरीगडावरून श्री खंडोबादेवाचा पालखी सोहळा निघणार आहे.

दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान कर्‍हा नदीवरील पापनाशक तीर्थावर कर्‍हास्नान होईल, असे या वेळी खंडोबा देवाचे मानकरी राजेंद्र पेशवे इनामदार यांनी सांगितले. या सोहळ्यासाठी श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने पालखी सोहळ्याच्या मार्गावर रस्त्यांची साफसफाई, पिण्याचे पाणी, नाष्टा, खांदेकरी व मानकरी यांना सॉक्स, टोपी तसेच मंडपव्यवस्था करण्यात आल्याचे देवसंस्थानचे विश्वस्त पंकज निकुडे पाटील यांनी सांगितले.

कडेपठार मंदिरावर बांधण्यात येणार्‍या शिखराबाबत नागरिक व भाविकांची तक्रार असून, याबाबत कडेपठार देवसंस्थानने नागरिकांना विश्वासात घेऊन बैठक घ्यावी व माहिती द्यावी, अशी मागणी या वेळी माजी नगरसेवक हेमंत सोनवणे यांनी केली. जेजुरी ग्रामस्थ, देवाचे मानकरी, पालखी सोहळ्याचे खांदेकरी यांना खंडोबादेवाचे दर्शन घेण्यासाठी पास घ्यावा लागतो, ही बाब योग्य नाही. ग्रामस्थांना थेट दर्शन मिळावे, अशी मागणी अनिल झगडे यांनी केली. ग्रामस्थ आणि खांदेकरी मानकरी यांना जेजुरीगडावर थेट दर्शनव्यवस्था करण्यात येणार असल्याचे या वेळी विश्वस्त संदीप जगताप यांनी सांगितले.

या वेळी पालखी सोहळा समितीचे पदाधिकारी राजेंद्र पेशवे, सुधीर गोडसे, अरुण खोमणे, छबन कुदळे, पंडित हरपळे, जालिंदर खोमणे, कृष्णा कुदळे, राजेंद्र चौधरी, माणिक पवार, सुभाष राऊत, वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी, रामदास राऊत, अशोक खोमणे, काळुराम थोरात, अनिल झगडे, देवसंस्थानचे विश्वस्त पंकज निकुडे, संदीप जगताप, राजकुमार लोढा, माजी व्यवस्थापक राजेंद्र जगताप, विश्वस्त नितीन राऊत, नगरसेवक जयदीप बारभाई, माजी नगरसेवक हेमंत सोनवणे, भारत शेरे, मेहबूब पानसरे, सुशील राऊत, शैलेश राउत आदी खांदेकरी आणि मानकरी उपस्थित होते.

वाहतूक नियंत्रणासाठी तरुणांनी सहकार्य करावे

पुणे-पंढरपूर महामार्गावर रोज वाहतुकीची मोठी कोंडी होते. सोमवतीच्या दिवशी जेजुरीतील तरुणांनी एक तास देऊन वाहतूक नियंत्रणासाठी रस्त्यावर येऊन सहकार्य करावे, असे आवाहन या वेळी नगरसेवक जयदीप बारभाई यांनी केले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news