पुणे : पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागातील मुलेही नाट्याभिनय शिकत असतील तर हे ऐकून आनंद होईल… हे खरंय… मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्या सुरू झाल्याने गुरू स्कूल गुफान संस्थेचे अध्यक्ष प्रा. देवदत्त पाठक आणि मिलिंद केळकर यांनी एक विशेष उपक्रम हाती घेतला असून, तोही गरजू मुलांसाठी मोफत आहे. संपूर्ण राज्यभरात बालरंगभूमीच्या प्रसारासाठी प्रा. पाठक आणि केळकर यांच्यातर्फे अभिनय प्रशिक्षण कार्यशाळा अभियान सुरू करण्यात आले असून, शहर, गाव, तालुका आणि वस्तीपातळीवरील गरजू मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाट्याभिनयाचे धडे गरजू मुलेही मोठ्या आत्मविश्वासाने गिरवत आहेत.
रंगमंचीय खेळ, रंगभूमी पाठ ही कार्यशाळांची संकल्पना आहे. आतापर्यंत मुंबई, पनवेल, ठाणे, परभणी, आंबेजोगाई, अमरावती, रायगड तसेच पुण्यात विविध ठिकाणी या कार्यशाळा झाल्या. आतापर्यंत 17 कार्यशाळा झाल्या असून, शहर, तालुका, गाव आणि वस्तीपातळीवरील गरजू मुलांना मोफत नाट्याभिनयाचे धडे दिले जात आहेत. मुलांना या कार्यशाळांमध्ये नाट्याभिनय शिकवला जात असून, रंगमंचीय खेळातून मुलांना अभिनयातील बारकावे शिकवले जात आहेत. मुले आनंदाने आणि आत्मविश्वासाने अभिनय शिकत असून, छोटे नाट्य प्रयोग करत आहेत.
प्रा. पाठक यांच्या या टीममध्ये उषा देशपांडे, अक्षता जोगदनकर, धनश्री गवस आणि संस्थेचे इतर प्रतिनिधीही मुलांना अभिनयाचे धडे देत आहेत. विविध गावांत, वस्त्यांमध्ये अभिनय कार्यशाळा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत घेतल्या जाणार आहेत. प्रा. पाठक म्हणाले, बालरंगभूमीच्या प्रसारासह गरजू मुलांनाही बालनाट्याशी जोडता यावे, त्यांनाही बालनाट्याचे जग कळावे आणि त्यांनी याचा आनंद लुटावा, नाट्याभिनयात पाऊल ठेवावे, यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. 'नाटक' व्यवसायासह प्रभावी व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त माध्यम ठरते आहे. प्रामुख्याने प्रशिक्षण, सराव आणि स्थानिक मुलांच्या भावविश्वावर आधारित प्रत्यक्ष नाट्यप्रयोग करण्याची संधी मुलांना मिळणार आहे. मुलांचा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, मुले आनंदाने अभिनयाचे धडे गिरवत आहे.
हेही वाचा