गोळीबार करणारे आरोपी अखेर जेरबंद; पोलिसांनी बारा तासांत केली अटक 

गोळीबार करणारे आरोपी अखेर जेरबंद; पोलिसांनी बारा तासांत केली अटक 

शिरूर : पुढारी वृत्तसेवा : शिरूर शहरात पिस्तुलातून गोळीबार करून दहशत निर्माण करणार्‍या रेकार्डवरील तीन गुन्हेगारांना शिरूर पोलिसांनी 12 तासांच्या आत अटक केली. न्यायालयाने या आरोपींना 17 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आरोपींकडून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा एकूण 20 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. दरम्यान, याप्रकरणी एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आदित्य नितीन भोईनल्लू (वय 21, रा. कामाठीपुरा, शिरूर) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी आशितोष काळे, अरबाज शेख, पप्पू राजापुरे, अरबाज खान, प्रवीण तुबाकी, प्रकाश गायकवाड, शुभम गाढवे, कुणाल म्हस्के (सर्व रा. शिरूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच यातील काळे, शेख आणि गायकवाड या तिघांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 13 जानेवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास शिरूर हद्दीत पुणे-अहमदनगर महामार्गावर ही घटना घडली होती. फिर्यादीचा भाऊ वैभव भोईनल्लू याच्यासोबत असलेल्या जुन्या वादाच्या रागातून अरबाज शेख याने फिर्यादीवर पिस्तुलातून गोळी झाडली. परंतु, ती लागली नाही. त्यानंतर कामाठीपुरा येथे हनुमान मंदिराजवळ दुचाकीवरून येऊन बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ, दमदाटी करून आशितोष काळे याने पिस्तुलातून गोळी झाडली. परंतु, ती गोळी फिर्यादीला लागली नाही, अशी तक्रार शिरूर पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानुसार शिरूर पोलिस ठाणे आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने आरोपी काळे, शेख आणि गायकवाड या तिघांना 12 तासांच्या आत अटक केली.

पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे व उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूरचे पोलिस निरीक्षक संजय जगताप, सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, संदीप यादव, पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार, सुनील उगले, गणेश जगदाळे, सहायक फौजदार तुषार पंदारे, हवालदार जनार्दन शेळके, बबलू नागरगोजे, राजू मोमीन, सहायक फौजदार गणेश देशमाने, प्रताप टेंगले, विनोद काळे, सचिन भोई, रघुनाथ हाळनोर, नीतेश थोरात, गणेश पालवे, अक्षय कळमकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news