नागापूर येथे बिबट्याचा बछडा मृतावस्थेत.. | पुढारी

नागापूर येथे बिबट्याचा बछडा मृतावस्थेत..

पारगाव : पुढारी वृत्तसेवा : नागापूर (ता. आंबेगाव) येथील भोंडवेवस्तीत बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. ही घटना सोमवारी (दि. 15) दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आली. नागापूर गावठाणाच्या पश्चिम दिशेला वासुदेव भोंडवे यांची शेतजमीन आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता सारंगधर वासुदेव भोंडवे हा व त्याची आई वीज पंप सुरू करण्यासाठी शेताकडे गेले असता त्यांना बिबट बछडा दिसला. त्यांनी आरडाओरडा केला.

परंतु त्या बछड्याची काही हालचाल झाली नाही. ते घरी निघून गेले. त्यानंतर काही वेळाने वासुदेव भोंडवे, लक्ष्मण निकम, मिलिंद मंचरे हे शेजारील शेतकरी पुन्हा शेताकडे गेले. त्यावेळी शिवशंकर बारकू पोहकर यांच्या शेतात बिबट बछडा मृतावस्थेत आढळला. त्याच्या मानेला मोठी जखम झाली होती. भोंडवे यांनी पोलिस पाटील संजय पोहकर यांना माहिती दिली. पोहकर यांनी वन विभागाला कळवले.

वनपरिमंडळ अधिकारी प्रदीप कासारे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक बालाजी पोतरे, वनसेवक महेश टेमगिरे यांनी घटनास्थळी दाखल होत मृत बछडा ताब्यात घेतला. मृत बछडा अंदाजे एक ते सव्वा वर्षाचा आहे. दुसर्‍या बिबट्याच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वन विभागाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला. वळतीचे पशूधन विकास अधिकारी डॉ. ए. डी. परांडेकर यांनी बछड्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर अवसरी घाटातील वन उद्यानात अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा

Back to top button