

कोंढवा(पुणे) : कात्रज-कोंढवा रस्त्यावर सोमवारी (दि. 14) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास एका भरधाव वाहनाने पायी जाणार्या विष्णू आदर्की यांना धडक दिली. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह पसार झाला. या रस्त्यावरील एका आठवड्यात अपघातात गेलेला हा चौथा बळी असून, बारा तासांतील दुसरा बळी आहे. संतापलेल्या नागरिकांनी या वेळी काही काळ चक्का जाम आंदोलन केले.
सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आदर्की (रा. कोंढवा बुद्रुक) हे खडीमशीन चौकाकडे पायी जात असताना कोंढवा बुद्रुक स्मशानभूमी जवळ एका आज्ञात वाहनाने पाठीमागून त्यांना धडक दिली. पसार झालेल्या वाहनचालकाचा कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध घेतला जात आहे. या रस्त्यावर वारंवार होणारे अपघात व होणार्या वाहतूक
कोंडीला कंटाळलेल्या ग्रामस्थांनी घटनास्थळी काही काळ चक्का जाम आंदोलन केले.
या वेळी नागरिकांनी तीव्र उतारावर मोठे स्पीड ब्रेकर उभारण्याची मागणी केली. माजी आमदार महादेव बाबर, तानाजी लोणकर, राजेंद्र ठोसर, संदीप बधे, समीर शिंदे, विनायक नाना कामठे, प्रवीण ठोसर, कैलास कामठे, सोनू टिळेकर, वसंत कामठे, मधुकर मरळ, चंद्रकांत गायकवाड, राकेश कामठे, गंगाधर बधे हे चक्का जाम आंदोलनात सहभागी झाले होते.
हेही वाचा