

पौड : पुढारी वृत्तसेवा : पौड (ता. मुळशी) येथे अज्ञात दुचाकीस्वाराच्या धडकेत प्रसिद्ध व्यावसायिक संतोष क्षीरसागर (वय 47) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा दुचाकीचालक धडक बसल्यानंतर पळून गेला. ही घटना शुक्रवारी (2) रात्री साडेअकरा वाजता घडली. संतोष क्षीरसागर हे आपले काम आटोपून रात्री पत्नी, बहीण आणि मुलीसह पौड बसस्थानकाहून आपल्या पौड कॉम्प्लेक्स येथील घरी पायी चालले होते. येथे असलेल्या सागर इन गार्डन हॉटेलसमोर मागून आलेल्या दुचाकीस्वाराने संतोष व त्यांच्या बहिणीला जोरदार धडक दिली. यात संतोष यांचे डोके दगडावर आदळले तर बहिणही बाजूला पडली. नातेवाईकांनी संतोष यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात नेले; मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला. संतोष क्षीरसागर यांचा पौड येथे सुमित व्हरायटीज नावाने व्यवसाय होता.
पौड गावाच्या दोन्ही बाजूला सपाट व उताराचा रस्ता असल्याने येथे वाहने वेगात असतात. गतिरोधक किंवा रम्बलर टाकावेत, अशी पौड ग्रामस्थांची गेल्या अनेक दिवसांची मागणी आहे. हा रस्ता वाहतुकीस धोकादायक झालेला असून अनेक निष्पाप नागरिकांचे यात नाहक बळी जात आहेत.
पौड येथे व्यावसायिकांनी लावलेल्या कॅमेरापैकी रस्त्याच्या बाजूला एकाही ठिकाणी कॅमेरा असल्याचे दिसून येत नाही. व्यावसायिकांनी सर्व कॅमेरे आपल्या दुकानांच्या सुरक्षेवर भर देत आतल्या बाजूला लावलेले आहेत. यामुळे अपघातग्रस्त तसेच चोरी करून पळून जाणारी वाहने सापडण्याची शक्यताच धुसर होत आहे.
हेही वाचा