खेड तालुक्यात मान्सूनपूर्व शेतीच्या मशागतीला वेग
वाडा; पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाची चाहूल लागताच मान्सूनपूर्व शेतीकामांना वेग आला आहे. खरीप हंगामातील पेरणीपूर्व शेतीची कामे शेतकर्यांनी हाती घेतली आहेत. यापूर्वी शेती पारंपरिक पद्धतीने बैलजोडीने केली जात होती. मात्र, शेतकरी आता यांत्रिकी पद्धतीने ट्रॅक्टरद्वारे शेती करू लागला आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाचे वातावरण तयार होऊन लागले आहे. त्यामुळे शेतकरी आता खरीप हंगामाची तयारी करू लागला आहे. शेतीची नांगरणी बैलजोडीने किंवा ट्रॅक्टरद्वारे करताना दिसून येते आहे. नांगरणी झाल्यावर त्याची वखरणी करून त्यात शेणखत मिळवण्याच्या कामे सुरू आहेत.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा मान्सून लवकरच सक्रिय होणार आहे. त्यामुळे शेतकरी शेतात नांगरणी, वखरणी नंतर जमीन पेरणी योग्य करून ठेवत आहेत. यंदा पेरणीस लवकर सुरुवात होणार अशी खात्री शेतकर्यांना आहे. बैलांसह शेतकर्याचे शारीरिक कष्ट व वेळ वाचवण्यासाठी ट्रॅक्टरच्या साह्याने शेती मशागत केली जात आहे. मात्र, डिझेलचे भाव गगनाला भिडल्याने मशागतीचा खर्चही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. परिणामी, शेतकर्यांचे आर्थिक बजेट ढासळत असल्याचे शेतकरी शंकर खाडे, रमेश कशाळे यांनी सांगितले.
हेही वाचा

