

सुवर्णा चव्हाण :
पुणे : कोरोनामुळे आणि निधीअभावी पुण्यातील ग्रंथालयांमधील जुन्या पुस्तकांच्या डिजिटलायझेशनचे काम गेल्या अडीच वर्षांपासून रखडले होते. पण, ग्रंथालयांच्या अनुदानाचा प्रश्न सुटल्याने आणि निधी उपलब्ध असल्याने विविध ग्रंथालयांमधील जुन्या पुस्तकांच्या डिजिटलायझेशनच्या कामाला गती मिळाली आहे. शंभर ते 60 वर्षे जुन्या पुस्तकांच्या डिजिटलायझेशनकडे ग्रंथालयांकडून भर दिला जात असून, काही ग्रंथालयांची एक हजार पुस्तके आणि काही ग्रंथालयांची 500 ते 600 पुस्तके पहिल्या टप्प्यात डिजिटलाईज झाली आहेत.
शहरातील बहुतांश ग्रंथालयांमध्ये अनेक जुनी आणि दुर्मीळ पुस्तके आहेत. काही शंभर वर्षे जुनी तर काही पुस्तके 60 ते 70 वर्षे जुनी आहेत. काही पुस्तकांची अवस्था खराब झाली असून, या पुस्तकांच्या डिजिटलायझेशनची आवश्यकता आहे. त्यासाठी ग्रंथालयांकडून विशिष्ट निधी खर्च करण्यात येत असून, टप्प्याटप्प्याने पुस्तके डिजिटलाईज करण्यात येत आहेत.
पुणे मराठी ग्रंथालयाचे अध्यक्ष धनंजय बर्वे म्हणाले, आम्ही काही दुर्मीळ आणि जुन्या पुस्तकांची सूची तयार करून त्या पुस्तकांचे डिजिटायझेशनचे काम हाती घेतले होते. परंतु, कोरोनामुळे आणि काही कारणांमुळे हे काम रखडले होते. पण, आता जवळपास एक हजार पुस्तकांचे डिजिटलायझेशन झाले आहे. हे काम पुणे नगर वाचन मंदिराच्या सहकार्याने करण्यात येत आहेत. पुणे नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे म्हणाले, आम्ही ग्रंथालयांना पुस्तकांच्या डिजिटलायझेशनची विनामूल्य सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
आताच्या घडीला चार ग्रंथालयांमधील पुस्तकांच्या डिजिटलायझेशनचे काम सुरू आहे. आमच्याही ग्रंथालयातील पुस्तकांचे डिजिटलायझेशन केले जात आहेत. सर्व 60 वर्षांपूर्वीची जुनी पुस्तके डिजिटलाईज करत आहोत. त्यांना आम्ही ही सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देत आहोत.
वाचनालयातील काही पुस्तकांचे डिजिटलायझेशन झाले आहे. वाचनालयात 1832 ते 1900 या काळातील 48 पुस्तके आणि 2 हस्तलिखिते आहेत. त्यातील 24 पुस्तके आणि 1 हस्तलिखिताचे डिजिटलायझेशन झाले असून, त्याला राज्य मराठी विकास संस्थेकडून अनुदान देण्यात आले आहे.
– राजेंद्र सुतार, सार्वजनिक वाचनालय, राजगुरुनगर
हे ही वाचा :