कवठे येमाई येथील तरुणावर बिबट्याचा हल्ला

कवठे येमाई येथील तरुणावर बिबट्याचा हल्ला

टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा :  कवठे येमाई (ता. शिरूर) येथील हिलाळवस्ती येथे शेतीला पाणी देत असताना परमेश्वर दत्तात्रय बोटकर (वय 21) या तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याने तो जखमी झाला. त्याची प्रकृती स्थिर आहे. शिरूर तालुक्यातील म्हसे बु. येथील महिलेवर हल्ला झालेली घटना ताजी असतानाच हा हल्ला झाला. बिबट्याचे पशुधनाबरोबर मानवावर होणारे हल्ले वाढले असून, वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जनतेतून जोर धरत आहे.

बिबट्यांच्या दहशतीने शाळकरी मुले, महिला व शेतकरी यांच्यामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. बोटकर हा तरुण मंगळवारी (दि. 6) संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास शेतीला पाणी देत होता. या वेळी अचानक बिबट्याने पाठीमागून त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्याने परमेश्वरच्या छातीवर पंजा मारला व डाव्या पायाला जबड्यात पकडले. परंतु, त्याने न घाबरता बिबट्याचा सामना करीत प्रतिकार केला. त्याने आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने शेजारील उसात पोबारा केला. घटनास्थळी वनपाल गणेश पवार, वनरक्षक नारायण राठोड, वन कर्मचारी हनुमंत कारकुड, कवठे येमाईचे उपसरपंच उत्तम जाधव, युवानेते अविनाश पोकळे, अतुल हिलाळ, सावकार शेटे यांनी
भेट दिली.

परिसरात उसाचे क्षेत्र जास्त असल्यामुळे बिबट्यांना नैसर्गिक अधिवास मिळाला आहे. जनतेने बिबट्यापासून सावध राहण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. शेतीला पाणी देण्यासाठी एकट्याने जाऊ नये. सोबत मोबाईल किंवा रेडिओ नेऊन त्याच्यावर मोठ्या आवाजात गाणे वाजवावे, सोबत काठी बाळगावी तसेच फटाके वाजवावेत.
                                                         – नारायण राठोड, वनरक्षक

बेट भागात बिबट्यांची संख्या वाढल्याने पशुधनाबरोबरच मनुष्यावर हल्ले वाढू लागले आहेत. शासनाने लवकरात लवकर बंदोबस्त करावा; अन्यथा या परिसरातील शेतकर्‍यांना शेती करणे कठीण होणार आहे. यापुढील काळात कोणाच्या जीवितास धोका झाल्यास त्यास सर्वस्वी वन खाते जबाबदार राहणार आहे. लवकरच यासंबंधी मी वन खात्यातील वरिष्ठांशी बोलणार आहे.
                                             – डॉ. सुभाष पोकळे, माजी पंचायत समिती सदस्य

या तरुणाच्या धाडसाचे कौतुक करावे तितके थोडे आहे. त्याने न डगमगता बिबट्याचा सामना केला. या तरुणाच्या जखमा बर्‍या होईपर्यंतच्या उपचारांची जबाबदारी वन विभागाने घ्यावी.
                                       – सुनीता बबनराव पोकळे, सरपंच, कवठे येमाई 

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news