रिल्सचे जग महिलांसाठी करिअर

रिल्सचे जग महिलांसाठी करिअर
Published on: 
Updated on: 

पुणे : विविध क्षेत्रांत काम करणार्‍या महिलाही आता इन्स्टाग्रामवर विविध चित्रपट गीतांवर रिल्स बनवू लागल्या आहेत आणि या रिल्समधून अनेक महिलांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. रिल्सद्वारे काही जणींना घरबसल्या ब—ॅण्ड प्रमोशनसह प्रॉडक्टवर आधारित रिल्स बनविणे, ट्रॅव्हल रिल्स बनविण्यासाठीची कामे मिळत असून, घरबसल्या त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळत आहे. 30 ते 50 वयोगटांतील महिलाही आता रिल्स बनविण्याकडे वळल्या आहेत आणि त्यांच्यासाठी हा करिअरचा नवा पर्याय बनला आहे.

…असे आहे रिल्सचे स्वरूप

इन्स्टाग्राम असो वा यू-ट्यूब शॉर्ट्ससाठी महिला वेगवेगळ्या गाण्यांवर 10 ते 30 सेकंदांचे रिल्स बनवत आहेत. स्वत: हे रिल्स शूट करण्यासह ते त्याचे एडिटिंग करण्याचे कामही त्या घरबसल्या करीत आहेत. रिल्समध्ये वापरण्यात येणार्‍या गाण्यासाठी साजेसा अभिनय, पेहराव आणि त्यात नृत्याचा वापर करून त्या रोज किमान तीन ते चार रिल्स बनवत आहेत. त्यांच्या रिल्सला शेकडो व्ह्यूव्जही मिळत आहेत, त्यामुळे त्यांना इन्स्टाग्राम आणि यू-ट्यूबवर फॉलो करणार्‍यांची संख्याही वाढत आहे. घरातील कामातून आणि जबाबदारीतून, नोकरीतून, व्यवसायातून वेळ काढून महिला रिल्स तयार करीत आहेत.

नवा पर्याय

इन्स्टाग्राम-फेसबुकवरील रिल्स असो वा यू-ट्यूब शॉर्ट्स तयार करण्यासाठी महिला रोज किमान दोन ते तीन तास काढत असून, आपल्या अधिकृत इस्टाग्राम-फेसबुक अकाउंटवरून त्या रिल्स बनवत असून, ब—ॅण्ड प्रमोशनबरोबरच एखाद्या कंपनीच्या प्रॉडक्टची रिल्सद्वारे जाहिरात करण्याचे काम त्या करीत आहेत. यातून त्यांना चांगला आर्थिक मोबदलाही विविध कंपन्या, संस्थांकडून मिळत आहे आणि घरबसल्या महिलांना करिअरचा नवीन पर्याय निर्माण झाला आहे.

…अशी होते रिल्सद्वारे कमाई

प्रायोजकत्व, व्ह्यूव्ज, ब्रॅण्ड प्रमोशन आणि जाहिराती यामुळे महिलांना चांगला आर्थिक मोबदला मिळत आहे. विविध कंपन्या आणि संस्थांसाठी प्रामुख्याने त्या ब—ॅण्ड प्रमोशनचे काम करीत आहेत. काही गृहिणीही पाकललेवरील, पर्यटनावरील, मेकअपवरील आदी विषयांवरील रिल्स तयार करीत आहेत आणि त्यांच्या वेगळ्या प्रयत्नाला पसंतीची पावती मिळत आहे. काही महिला एका महिन्यात 25 ते 40 हजार रुपयांपर्यंतची कमाई करीत असून, काही महिला त्यापेक्षा जास्त आर्थिक कमाई करीत आहेत.

मी काही दिवसांपूर्वीच रिल्स बनवायला सुरुवात केली आणि कळले की, हे एक वेगळे जग आहे. घरातल्या कामातून आणि जबाबदारीतून मिळणार्‍या फावल्या वेळेत आपण रिल्स करू शकतो, हे कळले, म्हणून मी रिल्स करायला सुरुवात केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. रिल्स बनविणे सोपे काम नाही, त्यासाठी मेहनत करावी लागते. माझे कुटुंबीयही मला यासाठी पाठिंबा देत आहेत. ब—ॅण्ड प्रमोशनच्या कामातून आर्थिक मोबदलाही मिळत आहे. आम्हा महिलांसाठी हा करिअरचा नवा पर्याय निर्माण झाला आहे.

– प्रियांका वाघमारे, नोकरदार महिला

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news