जामीनदार म्हणून खोट्या सह्या करत घेतले 77 लाखांचे कर्ज ; गुन्हा दाखल

जामीनदार म्हणून खोट्या सह्या करत घेतले 77 लाखांचे कर्ज ; गुन्हा दाखल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जामीनदार म्हणून दोघांच्या बनावट सह्या करून पतसंस्थेकडून 77 लाखांचे कर्ज घेतले. मात्र, घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने ज्यांच्या नावाने खोट्या सह्या केल्या त्यांनाच पतसंस्थेने वसुलीसाठी नोटिसा पाठवणे सुरू केले. आपली फसवणूक झाल्याचा हा प्रकार सदाशिव पेठेतील निनाद नागरी पतसंस्थेत डिसेंबर 2019 ते 25 जानेवारी 2024 दरम्यान घडला. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष, कोषाध्यक्ष व सचिव अशा चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी श्रीराम गॅस एजन्सीचे मयुरेश उदय जोशी (वय 38), उदय जोशी (वय 65, दोघे रा. सुवर्णनगरी सोसायटी, पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष आनंदनगर, सिंहगड रस्ता, पुणे), कोषाध्यक्ष रामलिंग शिवगणे (वय 66, रा. बालाजीनगर, धनकवडी), सचिव अशोक कुलकर्णी (वय 72, रा. सनसिटी सिंहगड रस्ता, पुणे) यांच्यावर फसवणूक, अपहार, संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार करणे व त्याचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तानाजी दिनकर मोरे (वय 42, रा. तुकाईनगर, वडगाव बु., पुणे) यांनी गुरुवारी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती, फिर्यादी हे श्रीराम गॅस एजन्सीमध्ये नोकरी करतात. गॅस एजन्सीचे मयुरेश जोशी याने निनाद नागरी पतसंस्थेकडून कर्ज घेतले आहे. डिसेंबर 2019 ते दि. 25 जानेवारी 2024 या कालावधीत मयुरेश याने कर्ज घेऊन त्यावर फिर्यादी तानाजी मोरे आणि गितांजली समुद्रे यांच्या जामीनदार म्हणून बनावट सह्या केल्या. निनाद नागरी पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष उदय जोशी व कोषाध्यक्ष शिवगणे, सचिव अशोक कुलकर्णी तसेच इतर संचालक मंडळातील सदस्यांशी संगनमत करून 77 लाखांचे कर्ज मंजुर करून घेतले होते. दरम्यान, या कर्जाची परतफेड न करता या कर्जाबाबत मोरे आणि समुद्रे यांना माहिती देण्यास टाळाटाळ केली. जामीनदार म्हणून दोघांच्या सह्या असल्याने व कर्जफेड न झाल्याने मोरे आणि समुद्रे यांनाच वेळोवेळी वसुली अधिकार्‍याच्या नोटिसा मिळाल्याचे त्यांनी पोलिस ठाण्यात याबाबत आपली फसवणूक झाल्याबाबत फिर्याद दिली. पुढील तपास विश्रामबाग पोलिस करत आहे.

हेही वाचा :

logo
Pudhari News
pudhari.news