

परींचे : पुढारी वृत्तसेवा : कार्तिक अमावस्येनिमित्त मंगळवारी (दि. 13) श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, वीज व जनरेटर, दर्शनबारी, तीन ठिकाणी वाहनतळ, परिसर स्वच्छता आदी सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. नवसाला पावणारा वीरचा श्रीनाथ म्हस्कोबा अशी ख्याती असल्यामुळे पुणे जिल्हा सहित इतर जिल्ह्यातूनही भाविकांनी गर्दी केली होती. नेहमीप्रमाणे कोडीतवरून अनेक भाविक पायी दर्शनासाठी वीर येथे आले होते. सर्वत्र 'सवाई सर्जाचं चांगभलं'चा जयघोष केला जात होता. त्यामुळे सर्व भाविक भक्तीरसात न्हावून गेले होते. पहाटे साडेचार वाजता पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. त्यानंतर सकाळी 6 वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला.
संबंधित बातम्या :
सकाळपासून देवस्थान ट्रस्ट व भाविकांतर्फे देवाला अभिषेक करण्यात आले. 10 वाजता देवाला भाविकांच्या दही-भाताच्या पूजा बांधण्यात आल्या. देऊळवाड्यात दगडी कासवावर सालकरी, गोसावी मंडळींचा पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर सुरू होता. दुपारी 12 वाजता धुपारती होऊन गाभारा तासभर बंद करण्यात आला. दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी गाभारा पुन्हा दर्शनासाठी खुला करण्यात आला.
वामन दौलती फडतरे, भानुदास कोंडीबा फडतरे (बोपगाव) यांच्यातर्फे मंदिरात अन्नदान करण्यात आले. सोमवारी (दि. 11) देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष धुमाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्याचा सुमारे 200 भाविकांनी लाभ घेतला, असे सचिव अभिजित धुमाळ यांनी सांगितले. व्हाईस चेअरमन रवींद्र धुमाळ, विश्वस्त हनुमंत धुमाळ, अमोल धुमाळ, नामदेव जाधव, संजय कापरे, रामचंद्र कुरपड, दत्तात्रय समगीर आदी मंडळींनी ट्रस्टतर्फे व्यवस्था पहिली.