व्यापार्‍यांच्या प्रश्नांबाबत पंधरवड्यात बैठक ; अब्दुल सत्तार यांचे आश्वासन

व्यापार्‍यांच्या प्रश्नांबाबत पंधरवड्यात बैठक ; अब्दुल सत्तार यांचे आश्वासन
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  देशाच्या प्रगतीत व्यापार्‍यांचे मोठे योगदान असून, त्यांच्या विविध मागण्यांबाबत येत्या पंधरवड्यात मुंबईत व्यापारी प्रतिनिधी आणि राज्य सरकारचे सचिव यांची बैठक घेतली जाईल, असे आश्वासन पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरुवारी (दि. 5) महाराष्ट्र राज्य व्यापारी परिषदेत दिले. व्यापारीवर्गाला येणार्‍या अडचणी दूर करू, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीतर्फे पुण्यात आयोजिलेल्या राज्यव्यापी व्यापारी परिषदेत सत्तार बोलत होते. राष्ट्रीय व्यापारी कल्याण बोर्डचे अध्यक्ष सुनील सिंघी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष जितेंद्र शहा, मोहन गुरनानी, दीपेन अग्रवाल, शरद मारू, राज्य व्यापारी कृती समितीचे समन्वयक आणि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, सूर्यकांत पाठक, बाबुलाल गुप्ता, माजी आमदार मोहन जोशी या वेळी उपस्थित होते. परिषदेला राज्यभरातून व्यापारी आले होते.

सत्तार म्हणाले, 'व्यापार्‍यांनी आज मांडलेल्या प्रश्नांबाबत सरकारचे सचिव पातळीवरील अधिकारी आणि व्यापारी प्रतिनिधींच्या बैठकीत चर्चा करू. त्यात निघालेला मार्ग मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची मी हमी देतो. त्यांच्यासोबतही व्यापारी प्रतिनिधींची बैठक घेऊ. सेस रद्द करण्यासह बाजार समिती नियम आणि अटींमध्ये काय प्रस्तावित बदल करायचे आहेत, ते विधिमंडळातही मांडले जातील.'

सुनील सिंघी म्हणाले, 'व्यापार्‍यांच्या हितासाठी राष्ट्रीय व्यापारी कल्याण बोर्ड स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच स्थापन झाले आहे. त्या माध्यमातून व्यापार्‍यांचे प्रश्न सोडविले जातील. व्यापार्‍यांना वयाच्या साठीनंतर 3 हजार रुपये पेन्शन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सर्व प्रकारच्या परवान्यांसाठी एक खिडकी योजना राबवली जाणार आहे.' राजेंद्र बाठिया यांनी प्रास्ताविकात व्यापार्‍यांच्या विविध मागण्यांचा आढावा घेतला. ते म्हणाले, 'दुहेरी कर आकारणी रद्द करावी. परंपरागत व्यापार नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मार्केट आवारातील 40 टक्के व्यापार कमी झाला असून, तो टिकविण्यासाठी राज्यातून सेस हद्दपार केला पाहिजे.'

ललित गांधी, जितेंद्र शहा, गुप्ता, अग्रवाल, पाठक यांनीही व्यापार्‍यांचे प्रश्न मांडले. बाजार समिती सेस रद्द व्हावा, एपीएमसीचे कालबाह्य कायदे दुरुस्त करावे, एफएसएसएआय कायद्याच्या आणि जीएसटीच्या जाचक अटी रद्द कराव्यात आदी मागण्या या वेळी विविध व्यापारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी केल्या. चेंबरचे सचिव रायकुमार नहार यांनी स्वागत केले. अजित बोरा, ईश्वर नहार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. दिनेश मेहता यांनी आभार मानले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news