आळंदी: संत ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्यात रथाला जुंपण्यात येणार्या मानाच्या बैलजोडींची आळंदी शहरात उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. राजा-प्रधान, आमदार-मल्हार व सावकार-संग्राम तसेच माउली-शंभू या चारही बैलजोडींची मिरवणूक काढण्यात आली.
ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली. यंदाची बैलजोडीची सेवा करण्याचा मान आळंदीतील अर्जुन घुंडरे, सचिन घुंडरे, विवेक घुंडरे आणि जनार्दन घुंडरे यांच्या घराण्याला मिळाला आहे. बैलजोडी मिरवणूक महाद्वारात आल्यानंतर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते बैलजोडीची पूजा करण्यात आली. आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांनी देखील या वेळी विधिवत पूजन केले.
घुंडरे कुटुंबीयांनी चार खिलारी बैलजोडी विकत घेतली आहे. दरवर्षीप्रमाणे आळंदीकरांकडून मानाच्या बैलजोडींची सवाद्य मिरवणूक काढली जाते. गोपाळपुर्यातील स्वामींच्या मठाजवळ गांधी कुटुंबीयांनी बैलजोडीचे पूजन केल्यानंतर मिरवणुकीस सुरुवात झाली.
या वेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील, अॅड. रोहिणी पवार, प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, माजी नगराध्यक्ष बबनराव कुर्हाडे, राहुल चिताळकर, विलासराव घुंडरे, रामचंद्र भोसले, नंदकुमार कुर्हाडे, संजय घुंडरे, माजी नगरसेवक अशोक कांबळे, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले, योगिराज कुर्हाडे, सुनील रानवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मिरवणुकीसाठी आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके, दिघी-आळंदी वाहतूक पोलिस निरीक्षक सतीश नांदुरकर, पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे आणि सहकारी यांनी सहकार्य केले.