

पुणे: पब, हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जाऊन पार्टी करण्यापेक्षा सध्या पुण्यामध्ये हाऊस पार्टीचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात रुजत असून पुणेकरांमध्ये हाऊस पार्टी म्हणजेच आपल्या घरीच सेलिब्रेशन करण्याचा ट्रेंड वाढत आहे. खासकरून विकेंड्सला अशा हाऊस पार्टींचे आयोजन होत असून, 22 ते 40 वयोगटातील तरुणाईमध्ये हा ट्रेंड सर्वाधिक आहे.
विशेष म्हणजे फक्त तरुणच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिकही हाऊस पार्टीचे आयोजन करत आहेत. पार्टीच्या नियोजनाचे काम इव्हेंट कंपन्यांना दिले जात आहे. हिंजवडी, कोथरूड, कोरेगाव पार्क, विमाननगर, खराडी, औंध, बावधन, बाणेर आदी ठिकाणी हाऊस पार्टीचे सर्वाधिक आयोजन केले जात आहे.(Latest Pune News)
गेल्या तीन ते चार वर्षांपासून हाऊस पार्टीकडे कल वाढत असून या पार्टीचे नियोजन करण्यासाठी इव्हेंट कंपन्यांना काम दिले जात आहे. त्यामुळे केटरिंग, सजावट, विद्युतरोषणाई, कलाकार आदींना काम मिळत आहे. त्याद्वारे होणारी उलाढालही वाढली आहे.
महिन्याला अंदाजे 30 ते 50 ठिकाणी हाऊस पार्टीजचे आयोजन केले जात आहे. पार्टीसाठीची सजावट, विद्युत रोषणाई, केटरिंग आदीचे नियोजन इव्हेंट कंपन्यांकडून करण्यात येत आहे. पुण्यामध्ये हिंजवडी, कोरेगाव पार्क, विमाननगर, खराडी, कल्याणीनगर, बावधन, बाणेर याठिकाणी हाऊस पार्टींचे प्रमाण मोठे आहे.
याविषयी पुणे रेस्टॉरंट्स अॅण्ड केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार म्हणाले, गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यात हाऊस पार्टीची संकल्पना पुण्यात रुजत आहे. हाऊस पार्टीसाठी 50 हजार ते 10 लाख रुपयापर्यंतचा खर्च येतो.
घरातच पार्टी करणे ही फारशी खर्चिक बाब नसल्याने फक्त तरुणच नव्हे तर ज्येष्ठही घरीच पार्टी करण्यावर भर देत आहेत. केटरिंग व्यावसायिकांपासून ते इव्हेंट कंपन्यांपर्यंत सगळ्यांना यामुळे काम मिळत आहे. जवळपास 150 हून अधिक इव्हेंट कंपन्या त्यासाठी काम करत आहेत. शनिवारच्या दिवशी होणार्या हाऊस पार्टीचे प्रमाण मोठे आहे.
... असे असते स्वरूप
घरीच आकर्षक सजावट, विद्युतरोषणाई करण्यासह लज्जतदार खाद्यपदार्थ, बॅकग्राउंडला वाजणारी गाणी आणि मनोरंजक खेळ असे हाऊस पार्टीचे स्वरूप आहे. घरातील गच्चीवर, बाल्कनीत, अंगणात पार्टी होताना दिसत असून, केटरिंगपासून ते संगीतापर्यंत, सजावटीपासून ते मनोरंजक खेळांपर्यंतचे नियोजन इव्हेंट कंपन्यांमार्फत केले जात आहे.
हाऊस पार्टी करणे आताच्या घडीला खूप सोयीस्कर आहे. वेगवेगळ्या थीमनुसार घरीच त्याचे नियोजन केले जाते. इव्हेंट कंपन्यांकडून त्या थीमनुसार पार्टीसाठीचा सेटअप घरीच करून दिला जातो, त्याचे केटरिंगपासून ते सजावटीपर्यंतचे नियोजन करून दिले जाते. त्यामुळे हाऊस पार्टीचे प्रमाण वाढत आहे. 50 ते 100 लोकांसाठी हाऊस पार्टीचे नियोजन केले जात आहे.
- निखिल कटारिया, सदस्य, इव्हेंट अॅण्ड एंटरटेन्मेंट मॅनेजमेंट असोसिएशन