

पुणे: गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये इस्ट्रोजेन हॉर्मोनचे प्रमाण जास्त असल्यास महिलांमध्ये रक्तदाब वाढण्याचा धोका असतो. वय 35 वर्षांपेक्षा जास्त असलेल्या महिला, कुटुंबात रक्तदाबाचा इतिहास, सातत्याने धूम्रपान करण्याची सवय असलेल्या महिला आणि जास्त मात्रेमध्ये गर्भनिरोधक गोळ्या घेणार्या महिलांना रक्तदाब वाढण्याचा धोका असतो.
पूर्वीच्या काळात गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये इस्ट्रोजेन नावाच्या हार्मोनचे प्रमाण जास्त असायचे. या हार्मोनच्या जास्त मात्रेमुळे काही महिलांना रक्तदाब वाढण्याचा धोका संभवत असे. आत्ताच्या काळात मिळणार्या गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये इस्ट्रोजेनचे प्रमाण कमी असते. (Latest Pune News)
‘इस्ट्रोजेन’ची मात्रा जास्त असेल तर रक्तदाब वाढण्याची शक्यता वाढते. त्यामुळे कोणत्या गर्भनिरोधक गोळ्या घ्याव्यात आणि किती घ्याव्यात, याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे मत प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुनीता तांदुळवडकर यांनी व्यक्त केले.
गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये
असणारे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टीन हे हार्मोन्स काही महिलांमध्ये रक्तवाहिन्यांवर परिणाम करून रक्तदाब वाढवू शकतात. गर्भनिरोधक गोळ्या सुरू करण्यापूर्वी रक्तदाब मोजणे आवश्यक आहे. गोळ्या घेत असताना दर 3-6 महिन्यांनी रक्तदाब तपासावा.
उच्च रक्तदाब असल्यास डॉक्टर दुसर्या प्रकारच्या गर्भनिरोधक उपायांचा सल्ला देऊ शकतात. गर्भनिरोधक गोळ्यांमुळे रक्तदाब वाढल्याचा संशय वाटत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.
अनियंत्रित रक्तदाबामुळे स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, डोळ्यांमधील समस्या अशा अनेक गुंतागुंती होऊ शकतात. मात्र, लवकर निदान, जीवनशैलीत बदल अणि उपचारातील सातत्याने ही गुंतागुंत टळू शकते.
रक्तदाब एकदा नियंत्रणात आला की काही रुग्ण स्वत:च औषधे बंद करून टाकतात आणि जोखीम वाढते. औषधे सुरू करण्याचा, कमी करण्याचा किंवा बंद करण्याचा निर्णय हा वय, वैयक्तिक आरोग्य, सहव्याधी इत्यादी अनेक बाबींवर अवलंबून असतो, अशी माहिती डॉ. डी. एन. हंबीरे यांनी दिली.
जीवनशैली - जोखीम वाढविणारा महत्त्वाचा घटक
अतिरिक्त ताण, खाण्यात अतिरिक्त मिठाचे प्रमाण, जंक फूड, चुकीचा आहार, अतिरिक्त मद्यसेवन, तंबाखू, व्यायामाचा अभाव हे अनेक आजारांबाबतीत जोखमीचे घटक आहेत. एकेकाळी मध्यम वयानंतर दिसणारा हा आजार आता तिशीमधल्या तरुणींमध्ये देखील वाढत चालला आहे. मधुमेह आणि स्थूलतेमुळे यात आणखी भर पडली