

पुणे: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराची मागणी केल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभेतील खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्याविषयक बदनामीकारक मजकूर असलेला फलक लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, आता हा फलक लावणार्याविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी कमलेश प्रधान (वय 47, रा. गणेशनगर, धायरी) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण प्रतिबंध अधिनियम व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाखाली अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 25) दुपारी साडेचारच्या सुमारास निदर्शनास आला होता. (Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कमलेश प्रधान यांचे घोले रोडला कार्यालय आहे. बालगंधर्व चौकाचे दर्शनी भागात एक आक्षेपार्ह मजकूरचा अनधिकृत बोर्ड लावला होता. त्या बोर्डवर ’कोथरूडच्या बाई आपणास नामांतराची एवढी खुमखुमी आली असेल तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावे,’ असा आक्षेपार्ह मजकूर लिहिलेला होता. त्यावर गिरीश गायकवाड (उपविभागप्रमुख शिवसेना), विलास सोनवणे (विभाग समन्वयक), अतुल दिघे (विभाग संघटक) अशी नावे व फोटो होते. त्यावर एकाचे नाव लिहिलेला फोटो त्याच्याविरुद्ध फिर्याद दिल्याने गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस हवालदार येरुणकर तपास करीत आहेत.
मेधा कुलकर्णी यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर असलेले फलक लावण्याप्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करावी. याबाबतचा अहवाल तत्काळ पाठविण्यात यावा, अशी सूचना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना दिली आहे.
मध्य रेल्वेच्या वतीने विभागातील सर्व खासदारांची बैठक घेण्यात आली होती. त्यात खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाचे नाव थोरले बाजीराव पेशवे असे करावे, अशी मागणी केली होती. त्याला विविध संघटनांनी विरोध केला होता. त्यातून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून बालगंधर्व चौकात एक बोर्ड लावण्यात आला होता.
यावरून खासदार मेधा कुलकर्णी यांची बदनामी केल्याचा दावा करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वेगवेगळ्या संघटनांनी डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.