School Bus: शालेय वाहनांमध्ये 31 जुलैच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसवा; आरटीओचे विद्यार्थी सुरक्षासंदर्भात आदेश
पुणे: सुरक्षित शालेय विद्यार्थी वाहतूक करणार्या वाहनांमध्ये 31 जुलैच्या आत सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश पुणे आरटीओकडून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
नुकत्याच झालेल्या बैठकीत पुणे पोलिस आयुक्तांनी या संदर्भातील आदेश पुणे आरटीओला दिले होते. त्यानंतर नवा आदेश काढत, आरटीओकडून पुणे पोलिस आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यावर भर दिला आहे. शालेय विद्यार्थ्यांसंदर्भातील अनुचित घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारीचे पाऊल उचलण्यात आले आहे. (Latest Pune News)
त्यानुसार 31 जुलै 2025 च्या अगोदरच शालेय वाहनांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. हे तपासणीसाठी आरटीओच्या वायुवेग पथकामार्फत विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
ज्या वाहनांना सीसीटीव्ही नसतील, अशा शालेय वाहनांवर तत्काळ कारवाई केली जाणार आहे. शालेय वाहनांमध्ये सीसीटीव्ही बसवल्यावर त्याची रोज तपासणी करण्याची जबाबदारी शाळा प्रशासन आणि शालेय परिवहन समितीची असणार आहे. यात हयगय करणार्यांवर कडक कारवाई देखील केली जाणार आहे.
तसेच, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या प्रत्येक वाहनाची नोंद शाळेकडे असणे आवश्यक असणार आहे. या शालेय वाहनांमध्ये 6 वर्षांखालील मुलांना ने-आण करण्यासाठी महिला कर्मचारी असणे बंधनकारक आहे, असे नसल्यास वाहनमालक-चालकावर कडक कारवाई होणार आहे. याशिवाय शालेय वाहनाचा चालक-कंडक्टर आणि क्लीनर यांची पोलिस पडताळणी बंधनकारक असणार आहे.
शालेय वाहनांना सीसीटीव्ही बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे सीसीटीव्ही बसवण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. त्या मुदतीत शालेय वाहनांना सीसीटीव्ही बसवून घ्यावेत. अन्यथा शालेय वाहन चालकांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
- स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

