Women Murder बारामतीत कुऱ्हाडीने वार करत महिलेचा खून, अंगणात शेळ्या जाण्यावरुन झाला होता वाद

 Women Murder बारामतीत कुऱ्हाडीने वार करत महिलेचा खून, अंगणात शेळ्या जाण्यावरुन झाला होता वाद

बारामती : पुढारी वृत्तसेवा; जुन्या भांडणाचा राग मनात धरून गंगूबाई तात्याराम मोरे (वय ५०, रा. कऱ्हावागज, ता. बारामती) यांच्यावर कुऱ्हाडीने वार (Women Murder) करत त्यांचा खून केल्याप्रकरणी किरण दादा मोरे (वय ३४) याच्या विरोधात तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  रविवारी (दि. ९) ही घटना घडली. किरण मोरे याला पोलिसांनी अटक केली आहे.

Women Murder अंगणात शेळ्या जाण्याच्या कारणावरून वाद 

मयत गंगूबाई यांची सून प्रमिला प्रमोद मोरे यांनी याबाबत फिर्याद दिली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, गेल्या अडीच वर्षांपूर्वी फिर्यादीच्या शेजारी राहणारे भावकीतील किरण दादा मोरे यांनी फिर्यादीच्या सासू-सासरे यांच्याबरोबर अंगणात शेळ्या जाण्याच्या कारणावरून भांडणे केली होती. त्यावेळी भावकीतील लोकांनी दोन्ही बाजूंची समजूत काढत भांडण मिटवले होते. त्यामुळे पोलिसात तक्रार देण्यात आली नव्हती. तेव्हापासून ही दोन्ही कुटुंबे एकमेकांशी बोलत नव्हती.

किरण हा घरासमोरून येता-जाता फिर्य़ादीच्या सासू-सासरे याकडे रागाने बघत असे. रविवारी दुपारी दीड वाजता फिर्य़ादीने पती प्रमोद, सासू गंगूबाई यांच्यासह एकत्रित जेवण केले. अर्ध्या तासाने पती प्रमोद हे बारामतीला कामावर निघून गेले. सासू गंगूबाई या नातू सार्थक व जीवन यांना सोबत घेत गप्पा मारण्यासाठी घराजवळील कांतीलाल मोरे यांच्या पत्राशेडजवळ गेल्या होत्या.

सासूचा कसा काटा काढला, तुझा पण काढतो

अडीचच्या सुमारास किरण हा हातात कुऱ्हाड घेवून पत्राशेडकडे जातना दिसला. त्याने तेथे जात गंगूबाई यांच्या डोक्यात पाठीमागून कुऱ्हाडीने वार केला. फिर्य़ादीने ते पाहताच जोरात आरडाओरडा केला. या घटनेत गंगूबाई या जमिनीवर कोसळल्या. फिर्यादीने धावत जावून किरण याच्या हातातील कुऱ्हाड हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याने त्यांना बाजूला ढकलून देत गंगूबाई यांच्या छातीवर पुन्हा कुऱ्हाडीने वार केला. तुझ्या सासूचा कसा काटा काढला, तु पुढे ये, तुझा पण काटा काढतो असे म्हणत हातातील कुऱ्हाड घेत तो फिर्यादीच्या अंगावर धावून आला. यावेळी तेथे जमलेल्या शाराबाई पगारे, अधिकाबाई मोरे, माणिक सोनवणे यांना फिर्यादीने त्याला धरण्याची विनंती केली. त्यावेळी तो कुऱ्हाड व पायातील चप्पल जागीच सोडून माळरानाच्या दिशेने पळून गेला.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सासू गंगूबाई यांची कोणतीही हालचाल दिसून येत नव्हती. फिर्य़ादीने पतीला फोनवरून याची कल्पना दिली. लागलीच पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. फिर्यादीच्या कुटुंबाने यावेळी किरण याला पकडण्याची मागणी केली. त्याला पकडले जात नाही तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नसल्याची भूमिका घेतली. अखेर पोलिस प्रशासनाने समजूत काढल्यानंतर मृतदेह बारामतीत सरकारी रुग्णालयात हलविण्यात आला. पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवत किरण मोरे याला अटक केली आहे. असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश विधाते यांनी दिली.

हेही पाहा: कोरोनाचा Heart Attack आणि Brain Hemorrhageशी काय संबंध?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news