अजित पवारांना मोठा धक्का, पुणे जिल्हा बँकेत भाजपचा शिरकाव; प्रदीप कंद विजयी | पुढारी

अजित पवारांना मोठा धक्का, पुणे जिल्हा बँकेत भाजपचा शिरकाव; प्रदीप कंद विजयी

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी क वर्ग मतदार संघातून १४ मतांनी बाजी मारत विजय मिळवला आहे. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या जिल्हा बँकेत भाजपने शिरकाव केला आहे.
आघाडीचे 14 उमेदवार बिनविरोध निवडून येऊनही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सहकार पॅनेलचे उमेदवार सुरेश घुले यांचा झालेला पराभव कार्यकर्त्यांना जिव्हारी लागला आहे. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी मिलींद सोबले यांनी प्रदीप कंद यांच्या विजयाची घोषणा करताच अल्पबचत भवनाबाहेरील कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण आले आणि विजयी जल्लोष करीत त्यांनी टाळ्या, शिट्ट्यांनी परिसर दणाणून सोडला.

क वर्ग मतदार संघ : एकूण मते ८०६, वैध मते ७९६, अवैध मते १०. मिळालेली मते पुढीलप्रमाणे : प्रदीप कंद ४०५, सुरेश घुले ३९१, दिलीप मुरकुटे शून्य मत.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (पीडीसीसी) पंचवार्षिक निवडणुकीत तालुका विकास सोसायटी अ वर्ग मतदारसंघातून शिरूरमधून आमदार अशोक पवार, हवेलीमधून विकास दांगट आणि मुळशी तालुक्यातून सुनील चांदेरे विजयी झाले आहेत. याबाबतची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले यांनी केली.

जिल्हा बँकेवर यापूर्वीच २१ पैकी १४ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित ७ जागांसाठी रविवारी मतदान झाले. आज सकाळी अल्पबचत भवन येथे मतमोजणीस सुरुवात झाली.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : या राजकीय घडामोडींनी गाजले 2021 साल | Rewind 2021

 

Back to top button