राणेंनी उणीदुणी काढण्यापेक्षा केंद्रातून निधी आणावा : अजित पवार | पुढारी

राणेंनी उणीदुणी काढण्यापेक्षा केंद्रातून निधी आणावा : अजित पवार

बारामती ; पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अर्थमंत्री प्रचाराला येवूनही फरक पडला नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (रविवार) बारामतीत राणे यांना प्रत्युत्तर दिले. ते केंद्रात मंत्री आहेत, एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा त्यांनी केंद्रातून निधी आणावा, आम्ही राज्याच्या माध्यमातून कोकणासाठी निधी उपलब्ध करून देत कोकणचा कायापालट करू, असा टोला पवार यांनी राणे यांना लगावला.

बारामतीतील मएसो विद्यालयात आज पवार यांनी पुणे जिल्हा बँकेसाठी मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनीही मतदान केले. यावेळी पवार यांनी विविध बाबींवर मते व्यक्त केली.

ते म्‍हणाले,  महाविकास आघाडीला सिंधुदुर्ग बँकेत दुर्दैवाने यश मिळाले नाही. ज्यांना यश मिळाले, त्यांचे अभिनंदन करतो. त्यांनी बँक चांगली चालवावी, अशा शुभेच्छा देतो असेही अजित पवार म्हणाले.

..तर न्यायालयात जावू…

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका नको ही महाविकास आघाडी सरकारची भूमिका असल्याचे पवार म्हणाले. इतर सर्वच राजकीय पक्षांचे या विषयावर एकमत आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे आम्ही गांभिर्याने पाहत आहोत. जोपर्यंत प्रत्येक घटकाला त्याचा अधिकार मिळत नाहीत तोपर्यंत निवडणूक होवू नये, यासाठी प्रसंगी न्यायालयात जाण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचे पवार म्हणाले.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला निवडणूका पुढे ढकलण्याबाबत सुचविले आहे. कोरोना पुन्हा वाढतो आहे. त्याचे गांभिर्य सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे, असेही पवार यांनी सांगितले

करोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी शासन सज्ज

कोरोनाची तिसरी लाट आली तर त्याचा मुकाबला कऱण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यासाठी नियोजन करत आढावा घेतला जात आहे. संभाव्य धोका लक्षात घेता व्हेंटीलेटर, ऑक्सिजन व साधे बेडस वाढविण्यासह ऑक्सिजन पुरवठा तिप्पट करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाला दिले असल्याचे पवार यांनी सांगितले. ते म्हणाले याशिवाय यंदाच्या अर्थसंकल्पात ग्रामीण रुग्णालयांसाठी चार हजार कोटींची तरतूद केली आहे.

महापालिका, नगरपालिकांच्या रुग्णालयात व्यवस्था उभारली जात आहे. जिल्हा नियोजन विकास निधीतील ३० टक्के रक्कम त्यासाठी खर्चाची परवानगी देण्यात आली आहे. चार कोटींच्या आमदार निधीपैकी एक कोटी रुपये आरोग्यासाठी खर्चास परवानगी देण्यात आली आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी घरोघरी जात सर्व्हेचे निर्देश देण्यात आल्याचे ते म्हणाले.

हेही वाचलं का? 

Back to top button