राज्यातील १० मंत्री, २० आमदार कोरोनाबाधित, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती  | पुढारी

राज्यातील १० मंत्री, २० आमदार कोरोनाबाधित, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती 

पुणे, पुढारी ऑनलाईन : “राज्यात आतापर्यंत १० अधिक मंत्री आणि किमान २० आमदार कोरोनाबाधित आढळले आहेत. जर कोरोना बाधितांची संख्या वाढतच राहिली की,  कडक प्रतिबंध लागू केले जाण्याची शक्यता आहे. राज्यात शुक्रवारपर्यंत कोरोना बाधितांची ८ हजार ६७ रुग्णसंख्या समोर आलेली आहे.”, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “विधानसभा सत्राचा काळ आम्ही कमी केला आहे. आतापर्यंत १० अधिक मंत्री आणि किमान २० आमदार कोरोनाबाधित आढळले आहेत. प्रत्येक जण जन्मदिवस, नवे वर्ष आणि इतर समारंभात सहभागी होऊ इच्छितो. पण, एक लक्षात घ्या की, ओमायक्राॅन वेगाने वाढत आहे. त्यामुळे सावधान राहण्याची आवश्यकता आहे.”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यामुळे काही राज्यांमध्ये नाईट कर्फ्यू लागू केलेला आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. जर रुग्णांची संख्या वाढत राहिली तर निर्बंध लागू केले जातील. त्यामुळे कडक निर्बंधांपासून वाचायचं असेल तर प्रत्येक नागरिकाने नियमांचे पालन करायला हवे”, अशीही माहिती अजित पवार यांनी दिली.

महाराष्ट्रात मागील १२ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे संमारंभाच्या ठिकाणी ५० लोकांची संख्या सीमित केलेली आहे. शुक्रवारी मुंबईत ५ हजार ६३१ प्रकरणं समोर आलेली आहेत. तर मागील काही दिवसांच्या तुलनेत ५३ टक्के वाढ झालेली दिसून आली आहे. सध्या मुंबईत ७ लाख ८५ हजार ११० कोरोनाबाधितांची संख्या गेलेली आहे.

Back to top button