covovax : सिरम व नोवोवॅक्सच्या ‘कोवोवॅक्स’ लसीच्या आपात्कालीन वापरासाठी मान्यता | पुढारी

covovax : सिरम व नोवोवॅक्सच्या ‘कोवोवॅक्स’ लसीच्या आपात्कालीन वापरासाठी मान्यता

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : जगात सर्वाधिक लस उत्पादन करणारी सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया आणि गंभीर आजारावर लस तयार करणारी जैवतंत्रज्ञान कंपनी ‘नोवोवॅक्स’ या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या नॅनोपार्टिकल प्रोटीन तंत्रज्ञानावर आधारित ‘कोवोवॅक्स’ या लसीला भारतीय औषध महानियंत्रक कार्यालय (डीसीजीआय) ने आपात्कालीन वापरासाठी मंगळवारी आज (दि.२८) मंजुरी दिली. ही लस १८ वर्षे व त्यापुढील नागरिकांसाठी दिली जाणार आहे. (covovax)

सिरम इन्स्टिटयूटने दिलेल्या माहितीनुसार कोवोवॅक्स ही लस सिरमकडून उत्पादित केली जाणार आहे. या लसीच्या आतापर्यंत तीन टप्प्यांत चाचण्या झाल्या आहेत. युके मध्ये झालेल्या चाचणीत ही लस कोरोनाच्या मुळ विषाणुवर ९६.४ टक्के तर अल्फा विषाणुच्या स्ट्रेनवर ८६.३ टक्के आणि एकुण सर्व स्ट्रेनविरूध्द ८९.७ टक्के प्रभावी ठरत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

covovax : गंभीर आणि सौम्य आजारांपासून १०० टक्के संरक्षण

तर युएस आणि मेक्सिकोमध्ये झालेल्या ‘प्रीव्हेंट – १९’ या चाचणीत कोरोनाच्या गंभीर आणि सौम्य आजारांपासून १०० टक्के संरक्षण देत असल्याचे दिसून आले आहे. ही लस घेतल्याने अँटीबॉडीचा प्रतिसाद उत्तम दिसून आला आहे. दरम्यान ही लस बाजारात कधी उपलब्ध होईल याबाबत कंपनीने अद्याप काही जाहीर केलेले नाही.

या लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून इंडोनेशिया, फिलिपिन्स येथे आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. तर ऑस्ट्रेलिया, कॅनडा, युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम येथे आपात्कालीन वापरण्यासाठी परवानगी द्यावी म्हणून जागतिक आरोग्य संघटनेकडे अर्ज केला आहे. तर, या वर्षाच्या शेवटी युएस एफडीए कडे परवानगी मागणार आहे.

या तंत्रावर आधारित आहे लस

कोवोवॅक्स ही लस प्रोटीनवर आधारित असून कोरोनाच्या पहिल्या स्ट्रेनचा जनुकीय क्रमाचा वापर करून तयार करण्यात आली आहे. कोरोनाच्या स्पाईक प्रोटीनपासून विलग केलेल्या अँटीजेनवर आधारित आहे. यामुळे कोरोनाविरोधी प्रतिकारशक्ती मोठया प्रमाणात वाढण्यास मदत होते. तसेच, न्युट्रिलायझिंग अँटीबॉडी देखील मोठया प्रमाणात तयार होतात. यामुळे कोरोनाचा विषाणुची एकापासून वाढणारी संख्या रोखते आणि त्यामुळे कोविड होत नसल्याचे समोर आले आहे.

ही आहेत वैशिष्टे

लसीच्या एका कुपीमध्ये 10 मिली लस असून एका व्यक्तीला 0.5 एमएल लस दिली जाणार आहे. तर, एका कुपीतील लस दहा जणांना पुरेल. ही लस 21 दिवसांच्या अंतराने दिली आणि ती 2 ते 8 सेल्सिअस तापमानाला साठवली जाउ शकते. त्यामुळे, सध्याच्या शीतसाखळी के्ंरदांमध्ये ती कोणताही बदल न करता साठवली जाउ शकते. तर लसीला संवेदनशील असणा-यांनी म्हणजे हायपरसेंसिटीव्हीटी असणा-यांनी ही लस घेउ नये असे सूचित करण्यात आले आहे.

कोवोवॅक्स लसीला आपात्कालीन वापरासाठी मिळालेली परवानगी हा कोरोनाविरोधी लढाईतील महत्वाचा टप्पा आहे. जवळपास ९० टक्क्याहून अधिक परिणामकारक असलेल्या या लसीची घोषणा करताना आम्हाला अभिमान वाटतो.
– आदर पुनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिरम इन्स्टिटयूट

Back to top button