Lungi Ngidi : भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडणा-या ‘लुंगी’कडे कधीकाळी क्रिकेट किट घेण्यासाठी पैसे नव्हते!

Lungi Ngidi : भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडणा-या ‘लुंगी’कडे कधीकाळी क्रिकेट किट घेण्यासाठी पैसे नव्हते!
Lungi Ngidi : भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडणा-या ‘लुंगी’कडे कधीकाळी क्रिकेट किट घेण्यासाठी पैसे नव्हते!

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेट विश्वात असे अनेक खेळाडू झाले आहेत, ज्यांचे बालपण संर्षातून गेले आहे. यातील काही खेळाडू तर अगदी गरीब कुटुंबातून आलेले आहेत. असे असूनही आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने अशा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. असाच एक दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज आहे ज्याचे नाव आहे लुंगी एन्गिडी (Lungi Ngidi).

सेंच्युरियन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताचा पहिला डावात ३२७ धावांवर आटोपला. तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने ५५ धावांमध्ये ७ विकेट गमावल्या. भारताच्या डावाला खिंडार पाडण्यात द. आफ्रिकेचा गोलंदाज लुंगी एन्गिडी आघाडीवर होता. त्याने सामन्याच्या पहिल्या दिवशी तीन आणि दुस-या दिवशी तीन असे एकून ६ बळी घेत टीम इंडियाचे कंबरडे मोडले. त्याने मयंक अग्रवाल (६०), चेतेश्वर पुजारा (०), विराट कोहली (३५), अजिंक्य रहाणे (४८), ऋषभ पंत (८), मोहम्मद शमी (८) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी (Lungi Ngidi) याचा जन्म २९ मार्च १९९६ रोजी डर्बनच्या नताल शहरात झाला. त्यांचे कुटुंब अतिशय गरीब होते. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने लुंगी एन्गिडीचे बालपण गरिबीत गेले. पण, त्याने कधीही आपल्या गरिबीला आपल्या स्वप्नांवर आड येवू  दिले नाही. आपल्या मेहनतीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघात त्याने स्थान निर्माण केले.

लुंगी एन्गिडीने (Lungi Ngidi) त्यांच्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, 'मला लहानपणापासूनच चांगले माहीत होते की माझे पालक इतर कुटुंबांसारखे नाहीत. म्हणूनच मी त्यांच्याकडून कधीच अशा गोष्टींची मागणी केली नाही, जी ते पूर्ण करू शकत नाहीत. माझे पालक क्रिकेटचे किट आणि इतर गोष्टी खरेदी करण्यास सक्षम नव्हते. सुरुवातीला मला खूप संघर्ष करावा लागला, पण त्यादरम्यान असे अनेक लोक पुढे आले ज्यांनी मला खूप मदत केली.'

लुंगी एन्गिडी (Lungi Ngidi) पुढे सांगतो, मी ज्या शाळेत शिकायला गेलो होतो. तिथे काही माझे मित्र झाले. मी त्यांच्यासोबत क्रिकेट खेळायचो. ज्यांच्यासोबत खेळलो, त्यांच्या पालकांनी मला क्रिकेटचे साहित्य जसे बॅट, पॅड इत्यादी गोष्टी दिल्या. तो दिवस मी कधीच विसरू स्कत नाही. त्या दिवसांसाठी मी आजही त्यांचा आभारी आहे. त्यांनी माझ्यासाठी जे केले त्याच्या जोरावरच मी एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटर होऊ शकलो.'

वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी आणि कागिसो रबाडा यांचा जन्म द. आफ्रिकेतील वर्णभेद धोरण संपुष्टात आल्यानंतर झाला. रबाडाच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली होती. पण लुंगी एन्गिडीचे कुटुंब गरीब. हे दोघेही लहानपणापासून एकमेकांचे मित्र आहेत. कौतुकाची बाब म्हणजे ते लहानपणापासून ते राष्ट्रीय संघापर्यंतच्या प्रवासात एकत्र क्रिकेट खेळत आहेत.

एन्गिडी रबाडा या त्याच्या शालेय दिवसातील मित्राविषयी सांगतो की, मी आणि रबाडा शाळेत एकत्र क्रिकेट खेळायचो. सध्या आम्ही राष्ट्रीय संघात खेळतो. आम्ही एकमेकांना खूप चांगले समजून घेतो. त्यामुळे मैदानावर आमच्यासाठी परिस्थिती सोपी जाते. माझी आर्थिक परिस्थिती बेताची आहे, तर रबाडाची चांगली आहे. पण आमच्या मैत्रीत कोणतीही अडचण आली नसल्याचे सांगून तो भावनिक होतो.

लुंगी एन्गिडीने आपल्यावेगवान गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिका संघात स्थान मिळवले. जानेवारी २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० सामन्यातून त्याने पदार्पण केले. एन्गिडीने पदार्पणाच्या सामन्यातच शानदार गोलंदाजी केली. त्याने २ षटकात १२ धावा देत २ बळी घेतले. पायाच्या दुखापतीमुळे त्यावेळी तो श्रीलंकेच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला. त्यानंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये भारताविरुद्ध वनडे पदार्पण केले.

जानेवारी २०१८ मध्ये भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने पदार्पण केले. एन्गिडीने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेसाठी ११* कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याच्या नावावर ३२* विकेट्स आहेत. त्याचबरोबर २९* एकदिवसीय सामने खेळून ५४* बळी घेतले आहेत. लुंगी एन्गिडीने २३* टी-२० सामन्यात ३६* विकेट घेतल्या आहेत. आतापर्यंत त्याने कसोटीत ५ आणि त्याहून अधिक विकेट्स घेण्याची किमया ३ वेळा केली आहे. तर वनडेत एकदा केली आहे.

२०१८ मध्ये भारताविरुद्धच्या मालिकेत लुंगी एन्गिडीने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. तेव्हापासून जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग आयपीएलच्या फ्रँचायझींच्या नजरा त्याच्यावर होत्या. आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्जने लुंगी एन्गिडीला आपल्या संघात समाविष्ट केले. एन्गिडीने आपल्या घातक गोलंदाजीने आयपीएल २०१८ मध्ये वर्चस्व गाजवले. त्या मोसमात त्याने ७ सामने खेळून ११ विकेट घेतल्या. लुंगी एन्गिडी दुखापतीमुळे IPL 2019 मध्ये खेळू शकला नाही. त्यानंतर तो पुन्हा एकदा IPL 2020 मध्ये CSK च्या संघाचा भाग राहिला. आयपीएल 2020 मध्ये त्याला फक्त 4 सामने खेळण्याची संधी मिळाली. ज्यात त्याने 9 विकेट घेतल्या.

टीप : * हे चिन्ह एन्गिडीच्या आकडेवारीत बदल होईल हे दर्शविते. सध्याच्या बातमीतील आकडेवारी ही भारत विरुद्ध द. आफ्रिका यांच्यातील सेंच्युरियन कसोटी सामन्यापर्यंतची आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news