माळीण दुर्घटनेला 9 वर्षे पूर्ण; ग्रामस्थांकडून मृतांना श्रद्धांजली

माळीण दुर्घटनेला 9 वर्षे पूर्ण; ग्रामस्थांकडून मृतांना श्रद्धांजली

भीमाशंकर : पुढारी वृत्तसेवा :  माळीण भूस्खलन दुर्घटनेला रविवारी (दि. 30) 9 वर्षे पूर्ण झाली. या स्मृतिदिनानिमित्त ग्रामस्थांनी दुर्घटनेतील 151 मृतांना दुर्घटना झालेल्या ठिकाणी बांधलेल्या स्मृतिस्तंभाजवळ सामूहिक श्रद्धांजली वाहिली. या वेळी मृतांच्या आठवणीने कुटुंबीय, नातेवाइकांना गहिवरून आले होते. पुणे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती संजय गवारी, बाजार समिती माजी सभापती देवदत्त निकम सभापती प्रकाश घोलप, शिव प्रतिष्ठानचे सुरेशराव भोर, शरद बँकेचे संचालक सोमनाथ काळे, मच्छिंद्र झांजरे, माळीणचे सरपंच रघुनाथ झांजरे, दिगांबर भालचिम आदी या वेळी उपस्थित होते.

स्मृतिस्तंभाजवळ मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ग्रामस्थांसह नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती. श्रद्धांजलीपर कार्यक्रमात अनेक ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. काहींनी जुन्या आठवणींना उजाळा देत सध्याच्या नवीन कामांबाबतच्या मागण्या व सूचना मांडल्या. स्मृतिस्तंभाला सभामंडप बांधून मिळावा, अशी मागणी करण्यात आली. पुनर्वसन माळीण गावठाणाच्या घरांच्या गळतीची दुरुस्तीची कामे लवकर पूर्ण करावीत. गावाला पिण्याच्या पाण्याची असणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी करून झालेल्या कामांबाबत ग्रामस्थांकडून प्रशासनाचे आभार मानण्यात आले.

देवराम झांजरे, सुहास झांजरे आदींनी मनोगत व्यक्त केले. वळसे पाटील म्हणाले, दुर्घटनेवेळी तालुक्यातील सर्व सहकरी संस्था, संघटनांनी मानवतेच्या दुष्टिकोनातून मदत करत येथील लोकांना धीर देण्याचे काम केले. तसेच सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माळीणला मदत व पुनर्वसनासाठी आजपर्यंत निधी कमी पडला नाही. तसेच अजून माळीण ग्रामस्थांनी सुचवलेली कामे पूर्ण करण्यात येतील. आम्ही माळीणवासियांच्या मागे भक्कमपणे उभे आहोत, असे आश्वासित केले.

इर्शाळवाडीतील बाधितांना मदत करणार
मानवतेच्या दृष्टिकोनातून माळीण ग्रामस्थांकडूनही 21 हजार रुपयांची आर्थिक मदत इर्शाळवाडीतील बाधितांना करण्याचा मानस मच्छिंद्र झांजरे व संंजय झांंजरे यांनी या वेळी व्यक्त केला.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news