पुणे : पुढारी वृत्तसेवा
एसएनडीटी महाविद्यालयाच्या आवारातील तब्बल 89 झाडांची कत्तल करण्यात आल्याचे उजेडात आले आहे. महापालिकेने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी शनिवारी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला आहे. महाविद्यालयाच्या विरोधात महापालिका न्यायालयात खटला दाखल करणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले आहे. मागील काही महिन्यांपासून एसएनडीटी महाविद्यालयाच्या आवारात वृक्षतोड होत असल्याची माहिती परिसरातील नाागरिकांनी महापालिकेला दिली होती.
याची खातरजमा करण्यासाठी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाचे वृक्ष निरीक्षक विलास आटोळे यांनी शनिवारी महाविद्यालयास भेट देऊन पाहणी केली. या पाहणीत तब्बल 89 झाडांची कत्तल झाल्याचे दिसून आले. याबाबत महाविद्यालय प्रशासनाकडे आटोळे यांनी विचारणा केली असता ठोस कारण देण्यात आले नाही तसेच या वृक्षतोडीसाठी परवानगीही घेतली नसल्याचे समोर आले.
यासंदर्भात महापालिकेकडून सविस्तर अहवाल तयार करून महाविद्यालयाविरोधात महापालिका न्यायालयात खटला दाखल केला जाणार असल्याचे महापालिका अधिकार्यांनी सांगितले आहे.
महाविद्यालय प्रशासनाने वृक्षतोडीचा दावा फेटाळून लावला आहे. यासंदर्भात महाविद्यालयाच्या प्रभारी शीतल मोरे म्हणाल्या, 'कोरोनाकाळात मोठ्या प्रमाणात झुडपे उगवल्याने येथील सापांचा धोका मुलींच्या वसतिगृहात वाढला होता. वसतिगृहाच्या खोलीत साप दिसत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अपघात टाळण्यासाठी आम्ही केवळ झुडपे हटविली आहेत. ुडपे व राडारोडा हटविताना यात नव्याने एक-दोन झाडे तुटली आहेत. मात्र, आम्ही नव्याने 40 झाडे लावून उद्यान साकारात आहोत.