

पिंपरी : मिलिंद कांबळे : पुणे मेट्रोच्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी आकर्षक रचनेतील मेट्रोचे स्टेशन वर्दळीच्या ठिकाणी बांधण्यात आले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तब्बल 10 हजार अधिकारी व कर्मचार्यांच्या सुविधेसाठी पालिका भवनाच्या आवारात मेट्रो स्टेशनचा जिना बांधण्यात आला आहे. कनेक्टिीव्हीटीच्या सुविधेमुळे नागरिकांना मेट्रो प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी-चिंचवड महापालिका भवन, संत तुकारामनगर, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी व दापोडी हे सहा स्टेशन उभारण्यात येणार येत आहेत.
संत तुकारामनगर व फुगेवाडी स्टेशनचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. उर्वरित स्टेशनची कामे वेगात पूर्ण करण्यात येत आहेत. त्या त्या भागांतील वैशिष्टयानुसार स्टेशनचे डिजाईन करण्यात आले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
वाहतुक वर्दळ व प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन योग्य ठिकाणी महामेट्रोने स्टेशनची उभारणी केली आहे. रेल्वे, एसटी व बीआरटी मार्गाला स्टेशन जोडण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना विनाखंड सलग वेगवेगळ्या सार्वजनिक प्रवासी सेवेचा लाभ घेता येणार आहे.
मोरवाडी, पिंपरी चौकातील महापालिका भवन स्टेशनमुळे पिंपरी चौक, पिंपरी कॅम्प, मोरवाडी, खराळवाडी, अजमेरा कॉलनी, मासुळकर कॉलनी आदी भागातील नागरिकांची सोय होणार आहे.
पालिका भवनाच्या आवारातील इन गेटच्या प्रवेशद्वाराजवळ मेट्रोचा जिना उभारण्यात आला आहे. पालिकेच्या सुमारे 10 हजार अधिकारी व कर्मचार्यांना ये-जा करण्यासाठी मेट्रो खूपच सोईची ठरणार आहे.
तसेच, कामानिमित्त पालिकेत आलेल्या नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, ठेकेदार व त्यांच्या प्रतिनिधी व इतरांसाठी जलद सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
लिफ्ट असल्याने ज्येष्ठ व आजारी कर्मचार्यांनाही मेट्रोच्या दुसर्या मजल्यावरील प्लॅटफार्मवर ये-जा करणे सुलभ होणार आहे. पालिका भवनाच्या रस्त्याच्या पलीकडे ये-जा करण्यासाठीही पादचारी पुलाचा वापर करता येणार आहे.
एसटीचे प्रवासी, वायसीएम रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईक, डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच, संत तुकारामनगर, वल्लभनगर परिसरातील नागरिकांसाठी संत तुकारामनगर स्टेशन सोईचे ठरणार आहे.
दापोडी स्टेशनमुळे सीएमई व केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. फुगेवाडी व कासारवाडी स्टेशन लोकवस्ती व औद्योगिक कंपन्यांच्या परिसरात आहे.
नाशिक फाटा स्टेशनमुळे रेल्वे प्रवासी, भोसरी, कासारवाडी, पिंपळे गुरव या भागांतील प्रवाशांची सोय होणार आहे. कासारवाडी रेल्वे स्टेशनच्या आवारात स्वतंत्र जिना बांधल्याने रेल्वे प्रवाशांना मेट्रोच्या स्थानकात थेट प्रवेश मिळणार आहे.
शहरातील वैशिष्ट्यानुसार मेट्रो स्टेशनचे सुशोभीकरण करण्यात येत आहे.नागरिकांच्या सोईसाठी सरकते जीने, साधे जीने व लिप्टची सोय स्टेशनच्या चारी बाजूस करण्यात आली आहे. तसेच, वाहनतळही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. स्टेशनच्या पादचारी मार्गाचा वापर मेट्रो प्रवाशांसह इतर नागरिकांनाही वापरता येणार असल्याचे महामेट्रोच्या अधिकार्यांनी सांगितले.