पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील उन्हाळी पिकांखालील सरासरी क्षेत्र 11 हजार 94 हेक्टर इतके आहे. त्यापैकी ताज्या अहवालानुसार नऊ हजार 110 हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या 82 टक्क्यांइतकी पेरणी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली. दुष्काळी स्थितीत चारा पिकासाठी म्हणून मका पिकाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे, तर उन्हाळी बाजरी पीक घेण्याकडील शेतकर्यांचा कल वाढत चालला आहे. जिल्ह्यातील एकूण अन्नधान्य पिकाखालील सरासरी क्षेत्र सहा हजार 129 हेक्टर असून त्यापेक्षा अधिक म्हणजे सहा हजार 858 हेक्टरवर म्हणजे 111 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.
उन्हाळी भुईमूगाचे सरासरी क्षेत्र तीन हजार 402 हेक्टर असून दोन हजार 98 म्हणजे 62 टक्के हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. मूगाचे 191 हेक्टरपैकी जेमतेम 48 हेक्टरवरच पेरा पूर्ण झाला आहे. मागील दोन वर्षे खरिपातील सोयाबीनचे पीक सततच्या पावसाने खराब झाले होते. त्यामुळे उन्हाळी हंगामात सोयाबीनची पेरणी ही प्रामुख्याने बीजोत्पादनासाठी करण्यात येत होती. आता बियाणांची मुबलकता असल्याने यंदा उन्हाळी सोयाबीन पेरणीला शेतकर्यांचा प्रतिसाद कमी असून कृषी विभागानेही मोहीम राबविलेली नाही.
खरीप हंगामात पावसाळी स्थितीमुळे बाजरी पिकावर कीड-रोगाचा प्रादुर्भाव होऊन उत्पादन घटते. त्यामुळे शेतकर्यांनी पावसाळ्यात बाजरी पीक घेण्याऐवजी उन्हाळी बाजरी पीक घेण्यावर भर दिल्याचे अलीकडील काही दिवसांत दिसून येत आहे. कारण, उन्हाळी हंगामात बाजरी पिकावर रोग, किडीचा प्रादुर्भाव तुलनेने कमी होतो. बाजरीचे सरासरी क्षेत्र चार हजार 232 हेक्टरइतके आहे. तर प्रत्यक्षात तीन हजार 820 हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या 90 टक्के क्षेत्रावरील पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात बाजरीची सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक पेरणी होऊन उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. शिवाय बाजरीचा चांगल्या दर्जाचा चाराही उपलब्ध होतो, असेही काचोळे यांनी सांगितले.
हेही वाचा