Cyber Crime : गुंतवणुकीच्या आमिषाने 41 लाख रुपयांची फसवणूक!

Cyber Crime : गुंतवणुकीच्या आमिषाने 41 लाख रुपयांची फसवणूक!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. सायबर चोरट्यांनी दोन तरुणांची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने 41 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका तरुणाने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणाच्या मोबाईलवर सायबर चोरट्याने संदेश पाठविला होता. शेअर बाजाराचे कामकाज ऑनलाइन सुरू असते. दररोज पैसे गुंतविल्यास चांगला परतावा मिळतो, असे आमिष दाखविले. तरुणाला शेअर बाजारातील व्यवहारांविषयी माहिती दिली.

त्याला एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. अ‍ॅपमध्ये बँक व्यवहाराची माहिती भरण्यास सांगितली. सायबर चोरट्याने तरुणाला वेगवेगळ्या बँक खात्यांत पैसे भरण्यास सांगितले. तरुणाने वेळोवेळी 24 लाख रुपये बँक खात्यात जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्याने त्याचा मोबाईल क्रमांक बंद केला.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पतंगे तपास करीत आहेत.
दुसर्‍या घटनेत सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक भागातील एका तरुणाची शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने 17 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत तरुणाने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार तपास करीत आहेत.

ज्येष्ठ नागरिकाची फसवणुकीची तक्रार

शेअर मार्केटशी संबंधित आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून 30 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात मोबाईलधारकावर एका 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या फिर्यादीवरून सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने 70 लाखांना गंडा

मुलाला एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो, असे सांगून तब्बल 70 लाख उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सुनील नामदेव गडकर (वय 32, रा. आंबेगाव बुद्रुक) याच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 29 नोव्हेंबर 2023 ते 13 एप्रिल 2024 या कालावधीत घडला आहे. याबाबत राजेंद्र विठ्ठल बहिरट (वय 60, रा. कसबा पेठ) यांनी रविवारी (दि. 13) विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सुनील गडकर याने फिर्यादीची भेट घेऊन मुलाला एमबीबीएस कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे खोटे आश्वासन दिले.

त्यासाठी आरोपीने सही केलेला कोरा धनादेश देऊन फिर्यादींचा विश्वास संपादन केला. त्यानंतर प्रवेश घेण्याच्या बहाण्याने वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादींकडून ऑनलाइन 58 लाख 79 हजार आणि 10 लाख 90 हजार रोख असे एकूण 69 लाख 70 हजार रुपये उकळले. मात्र, पैसे दिल्यानंतरही आरोपीने फिर्यादी यांच्या मुलाचे अ‍ॅडमिशन करून दिले नाही. विचारणा केली असता वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे दिली म्हणून फिर्यादींनी पैसे परत दे, असे सांगितल्यावर फोन उचलणे बंद केले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर बहिरट यांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक निंबाळकर करत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news