शिपाई पदाच्या 262 जागांसाठी 15 हजार अर्ज; भरतीप्रक्रियेला सुरुवात

शिपाई पदाच्या 262 जागांसाठी 15 हजार अर्ज; भरतीप्रक्रियेला सुरुवात

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलातील 262 शिपाई पदासाठी पंधरा हजार जणांनी अर्ज केले आहेत. बुधवार (दि. 19) पासून भोसरीतील इंद्रायणीनगर मैदानावर ही भरतीप्रक्रिया पार पाडली जाणार आहे. आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर सात वर्षांनी प्रथमच शहरात भरती घेतली जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहर पोलिस भरतीमध्ये सर्वसाधारण उमेदवारांसाठी 79 पदे, महिला 78 पदे, खेळाडू 15 पदे, प्रकल्पग्रस्त 14 पदे, भूकंपग्रस्त 4 पदे, माजी सैनिक 41 पदे, अंशकालीन पदवीधर 11 पदे, पोलिस पाल्य 7 पदे, गृहरक्षक दल 13 पदे, अनाथ 3 पदे भरली जाणार आहेत.

भरतीप्रक्रियेत प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येईल. त्यामध्ये किमान 50 टक्के गुण मिळवणार्‍या उमेदवारांमधून 1:10 प्रमाणात उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांनी लेखी परीक्षेत किमान 40 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. 40 टक्क्यांहून कमी गुण मिळवणारे उमेदवार अपात्र समजले जातील.

शारीरिक आणि लेखी चाचणीमधील गुणांच्या आधारे उमेदवारांची एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल. त्या उमेदवारांची मूळ कागदपत्रे पडताळणी केली जाईल. कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तयार केली जाईल. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल. भरती प्रक्रियेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी 396 पोलिस अधिकारी, अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे.

पावसामुळे एखाद्या दिवशी मैदानी चाचणी न झाल्यास, उमेदवारांना पुढील तारीख दिली जाईल. काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदांकरिता एकापेक्षा जास्त ठिकाणी अणि एकाच दिवशी मैदान चाचणीकरिता हजर राहण्याची सूचना प्राप्त झाली असेल, तर अशा उमेदवारांना दुसरी तारीख देण्यात येईल. उमेदवारांना अडचणी असल्यास त्यांचे निरसन स्थानिक पातळीवर केले जाईल.

आवश्यक सुविधा उपलब्ध

शहर पोलिस दलातील 262 जागांसाठी 15 हजार 42 उमेदवारांचे अर्ज आले आहेत. त्यात दोन तृतीयपंथी उमेदवारांचा समावेश आहे. मैदानी चाचणीसाठी पहिल्या दिवशी 500, त्यानंतर दररोज 1200 उमेदवार आणि 5 जुलै रोजी 1620 उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे. मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप हे संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर या मैदानावर होणार असून, इथे पिण्याचे पाणी, फिरते प्रसाधन गृह, खाद्यपदार्थांचे स्टॉल, वैद्यकीय सुविधा, रुग्णवाहिका इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

सर्वाधिक पदे बृहन्मुंबईमध्ये

राज्यात 9 हजार 595 पोलिस शिपाई पदे, 1 हजार 686 चालक पोलिस शिपाई पदे, 4 हजार 449 सशस्त्र पोलिस शिपाई पदे, 101 बॅण्ड्समन पदे, 1 हजार 800 कारागृह पोलिस शिपाई अशी एकूण 17 हजार 531 पोलिस शिपाई पदांची भरती केली जात आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलात 262 पदांची भरती केली जात आहे. सर्वाधिक पदे बृहन्मुंबई पोलिस दलात भरली जाणार आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील पोलिस भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी घेतली असून डमी उमेदवार उपस्थित राहू नये, यासाठी बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे.

– सुनील रामानंद, पोलिस आयुक्त (प्रभारी), पिंपरी-चिंचवड

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news